जिह्यात आज सलग चौथ्या दिवशीही सर्वत्र पावसाने संततधार हजेरी लावली. त्यामुळे नद्या, ओढे-नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर, यंदा चौथ्यांदा पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले. दुपारी तीनच्या सुमारास 29 फूट 2 इंचांवर गेलेल्या पंचगंगेच्या पातळीत गेल्या 24 तासांत आठ फुटांची वाढ झाली होती, तर जिह्यातील 36 बंधारे पाण्याखाली गेले होते.
दरम्यान, काल सकाळी उघडलेल्या राधानगरी धरणाच्या चार स्वयंचलित दरवाजांपैकी आज सकाळी 11च्या सुमारास 3 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा बंद झाला असला, तरी धरणाच्या 4, 5 व 6 या दरवाजांमधून चार हजार 284 आणि पॉवर हाऊसमधून एक हजार 500 असा एकूण पाच हजार 784 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू होता.
कोल्हापूर जिह्यात 24 तासांत एकूण 32.9 मि.मी. पाऊस
कोल्हापूर जिह्यात गेल्या 24 तासांत एकूण 32.9 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली. जिह्यात सर्वाधिक राधानगरी तालुक्यात 80.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर, हातकणंगले 22.5, शिरोळ 7.9, पन्हाळा 38.8, शाहूवाडी 32.28, गगनबावडा 51.5, करवीर 21.8, कागल 25.4, गडहिंग्लज 24.1, भुदरगड 53.8, आजरा 66.9 आणि चंदगड तालुक्यांत 33.9 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाड कोसळले
कोल्हापूर जिह्यात अधूनमधून अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही भागांत वृक्ष उन्मळून पडत आहेत. वाहतुकीने नेहमीच गजबजलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय ते शासकीय विश्रामगृह मार्गावरील आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयासमोर भलेमोठे झाड आज कोसळले. त्याखाली चारचाकी वाहन अडकून नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम दिसून आला.
शिरोळ तालुक्यातील चार बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील शिरोळ, तेरवाड, तर कृष्णा नदीवरील कनवाड व राजापूर हे चारही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे बंधाऱयांवरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शिरोळ तालुक्यात महापुराने थैमान घातले होते. गेले 15 दिवस महापुराचे पाणी थांबून होते. पावसाचा जोर कमी झाला, तसेच धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग थांबल्याने जिह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत संथ गतीने घट होत पूर ओसरला. पण ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. यामुळे जिह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील तेरवाड व शिरोळ, तर कृष्णा नदीवरील कनवाड राजापूर या बंधाऱयावर पाच फूट पाणी असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.