गोविंदा रे गोपाळा… मुंबईभरात आज दहीहंडीचा उत्साह

‘गोविंदा रे गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’ म्हणत गोविंदा पथके मुंबईसह ठाण्यातील उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. यानिमित्ताने गोविंदा पथक थरावर थर रचून बक्षिसांची लयलूट करणार आहेत. देशात घडत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे महिला सुरक्षा या विषयावर पथके जनजागृती करणार आहेत.

महिलांच्या सुरक्षा, सन्मानासाठी दादरच्या आयडियलची दहीहंडी

दादरच्या आयडियल येथील दहीहंडी उत्सवात यंदा महिला अत्याचाराविरोधातील देखावा दहीहंडीसाठी रचलेल्या थरांवर दाखवला जाईल. या देखाव्याचे सादरीकरण सकाळी 10.30 वाजता होणार असून याद्वारे बदलापूरमधील घटनेचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने साई दत्त मित्र मंडळ, बाबू शेठ पवार व मित्र मंडळ आणि आयडियल दादरतर्फे आयोजित या पर्यावरणपूरक दहीहंडी उत्सवात दरवर्षी मोठय़ा प्रमाणात महिला आणि पुरुष गोविंदा पथक हजेरी लावतात. यंदा प्रमुख पाहुणे म्हणून मिस्टर एशिया रोहन कदम, मिस्टर इंडिया सुहास खामकर आणि अभिनेता भूषण घाडी उपस्थित राहणार आहेत. यंदाचे आकर्षण म्हणजे दिव्यांग व अंधांच्या गोविंदा पथकांचाही सहभाग असणार आहे. मालाड पूर्व येथील शिवसागर गोविंदा पथक महिला अत्याचाराविरोधातील आणि शिवकालीन मावळ्यांच्या इतिहासावरील देखावा सादर करणार आहे.

सेलिब्रेटींची मांदियाळी

मराठी सेलिब्रेटींचीदेखील मांदियाळी येथे असणार आहे. ‘मन धागा धागा जोडतो नवा’ या मालिकेतील अभिषेक राहाळकर, मयुरी देशमुख यांच्यासह ‘दुर्गा’ आणि ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेतील कलाकार तसेच ‘सारेगमप’ फेम स्वरा जोशी तसेच ‘सुपरस्टार सिंगर आवाज उद्याचा’मधील गायक या दहीहंडीला उपस्थित राहतील.

मंडळांना देणार महिला सुरक्षा शपथ 

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना शाखा 192 आणि बँक ऑफ इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि सिनेकलावंतांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी महिला सुरक्षा शपथ सर्व मंडळांना दिली जाईल, अशी माहिती शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे आणि स्थानीय लोकाधिकार समिती सरचिटणीस अजय सावंत यांनी दिली.