शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर पळापळ, पालिकेच्या 123 शाळांमध्ये 2800 ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या 123 शाळांमध्ये पुढील दोन महिन्यांत तब्बल 2800 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी दीड वर्षापूर्वी आदेश देऊनही काम न झाल्यामुळे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांचे निलंबन झाल्यानंतर पालिका प्रशासनाची धावपळ उडाली असून कामही सुरू करण्यात आले आहे. हे काम येत्या दोन महिन्यांपर्यंत पूर्ण करू असे हमीपत्र शिक्षण विभागाकडून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांना देण्यात आले आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी 18 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

बदलापूरच्या आदर्श शाळेमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर मुंबईच नव्हे तर राज्यातील शाळांमधील सर्वच विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकाही खडबडून जागी झाली असून शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱयांचा रेकॉर्डिंग आणि बॅकअप सुरक्षित ठेवण्यात येणार असल्यामुळे अत्याचाराच्या घटनांना आळा बसणार असून दुर्दैवाने अशा घटना घडल्यास गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा देणे शक्य होणार असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई महिलांकडून

पालिका शाळांमधील सर्व इमारतींमधील स्वच्छतागृहांची सफाई करण्याचे काम महिला सफाई कर्मचाऱयांकडून करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे, तर आता सीसीटीव्हीदेखील बसवण्यात येणार असल्यामुळे सुरक्षा वाढणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

शिक्षणाधिकाऱयांचे निलंबन रद्द करण्यासाठी आटापिटा

दीड वर्षापूर्वी शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आदेश देऊनही कार्यवाही केली नसल्यामुळे पालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश कंकाळ यांचे निलंबन करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. या नामुष्कीमुळे निलंबन रद्द करण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रशासनाकडे वेगाने पाठपुरावा करण्यात येत आहे. निलंबन रद्द करण्यासाठी दोन महिन्यांत सर्व 123 शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी लेखी हमी अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांना दिल्याचे समजते. त्यामुळे कंकाळ यांचे निलंबन मागे घेण्यात येते की कारवाई सुरू राहते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.