अस्मिता धुळीत मिळालीय; महाराष्ट्राने आता शांत बसू नये, पेटून उठा; इंद्रजीत सावंत यांचे आवाहन

भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल असताना शिवरायांचा अनेकदा अपमान केला, पण सरकारने काहीच केले नाही, लोकसभा निवडणुकीतील मतांवर डोळा ठेवून घाईघाईने शिवरायांचा बेढब पुतळा सिंधुदुर्गावर उभारून पंतप्रधान नरेद्र मोदींनी त्याचे अनावरण केले त्यावेळीही कुणीही काहीही बोलले नाही. आज तो पुतळा कोसळला. महाराष्ट्राचीच नव्हे तर हिंदुस्थानची अस्मिता धुळीला मिळालीय. आता महाराष्ट्राने शांत बसू नये, पेटून उठले पाहिजे, असे आवाहन इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांनी केले.

शिवरायांबद्दल, गडकिल्ल्यांबद्दल जरा जरी कुणाच्या तोंडून आक्षेपार्ह शब्द चुकून जरी निघाला तरी सोशल मीडियावर त्याच्यावर तुटून पडले जाते. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे उदाहरण दिले म्हणून साताऱ्यात एका महिलेच्या घरावर शेकडो लोक धावून गेले, मग ती मंडळी शिवपुतळा कोसळल्यानंतर गप्प का बसलीत, असा संतप्त सवालही इंद्रजीत सावंत यांनी केला. महाराष्ट्र ही शिल्पकारांची जननी आहे. आद्य शिल्पकार गणपतराव म्हात्रे, शिल्पगुरू विनायकराव करमरकर, रावबहादूर म्हात्रे, कलामहर्षी बाबूराव पेंटर, राम सुतार यांनी साकारलेली शिवरायांची व अन्य महापुरुषांची शिल्पे 100 वर्षांनंतर आजही तमाम शिल्पकारांना अभ्यासाची प्रेरणा देत आहेत. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापुरातील या शिल्पकारांची शिवशिल्पे अगदी हुबेहूब वाटतात. सिंधुदुर्गावरील शिवपुतळा पाहिला तर महाराजांशी मिळतेजुळते असे काहीच त्यात दिसत नव्हते. पुतळा उभारताना नौदलाने किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याने तज्ञांची मदत घेतलीच नाही असे त्यातून सिद्ध होते, असे इंद्रजीत सावंत म्हणाले.

इंद्रजित सावंत यांनी गेल्या वर्षीच दिला होता इशारा

सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारताना काळजी घ्यायला हवी, अभ्यास करायला हवा, असा सल्ला इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी राज्य शासनाला आठ महिन्यांपूर्वीच एका पत्राद्वारे दिला होता, परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नव्हती.

आद्य शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांनी तयार केलेली शिवाजी महाराजांची आणि इतर महापुरुषांची शिल्पे ही शंभर वर्षांपूर्वी तयार करूनही आजही जगात शिल्पांचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखली जातात. त्याचप्रमाणे शिल्पगुरू विनायकराव करमरकर, रावबहादूर म्हात्रे, कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी साकारलेली शिवरायांची शिल्पे 100 वर्षांनंतर आजही तमाम शिल्पकारांना अभ्यासाची प्रेरणा देत आहेत. मात्र राजकोटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला शिवरायांचा पुतळा पाहिला तर शिवाजी महाराजांचा सन्मान करायचा आहे की, घाईगडबडीत कार्यक्रम उरकून घेण्यासाठी हे शिल्प बसवलेले आहे असे वाटते, असे इंद्रजित सावंत यांनी त्या पत्रात नमूद केले होते.  महापुरुषांचे शिल्प बसवण्यासाठी मान्यता देणारी महाराष्ट्र शासनाची शिल्पकारांची समिती  आहे. ही समिती शिल्पकलेच्या दृष्टीने या अशा सार्वजनिक स्मारक शिल्पांचे परीक्षण करते, शिल्पकारांना मार्गदर्शन करते आणि मग त्या शिल्पाला मान्यता देते. त्या समितीने शिवरायांच्या या शिल्पाचा अभ्यास केला आहे का, असा प्रश्न पडावा असे हे शिल्प आहे, असे मत सावंत यांनी मांडले होते.