शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलसमोर हुल्लडबाजी करणाऱ्या भाजपच्या चिल्यापिल्यांना शिवसैनिकांनी चोप दिला. कोणतीही परवानगी न घेता भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनाला पोलिसांनी पाठीशी घातले. भाजपच्या मिठाला जागून पोलिसांनी शिवसैनिकांवरच लाठीमार केला. महिला शिवसैनिकांवर लाठ्या चालवत आहोत याचेही भान मिंधेगिरी करणाऱ्या पोलिसांना राहिले नाही.
शिवसंकल्प मेळाव्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनलसमोर सकाळीच भाजपचे हर्षवर्धन कराड, जालिंदर शेंडगे यांच्यासह काही फुटकळ कार्यकर्ते गोळा झाले आणि घोषणाबाजी करू लागले. भाजपची पिलावळ राडा करण्याच्या तयारीत असल्याचे कळल्यावरून शिवसैनिकही अगोदरच तयारीत होते. शिवसैनिकांनी या चिल्यापिल्यांना चांगलेच चोपून काढले. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच तंतरली.
भाजपच्या मदतीला पोलीस धावले
शिवसेनेचे विभागीय नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे काही कार्यकर्ते हॉटेलसमोर नौटंकी करणार असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना दिली होती. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू असतानाच पोलीस हाताची घडी घालून उभे होते. मात्र काही मिनिटांत अचानक भाजपच्या मिठाला जागत पोलिसांनी शिवसैनिकांवर अमानुष लाठीमार करण्यास सुरुवात केली. महिला आघाडीच्या सुकन्या भोसले यांना तर फरफटत नेले.
पोलिसांनी मिंधेगिरी केली, अंबादास दानवे यांचा आरोप
पोलिसांनी मिंधेगिरी करत शिवसैनिकांवर लाठीमार केला. भाजपचे कार्यकर्ते नौटंकी करणार असल्याची पूर्वकल्पना आपण स्वतः पोलीस आयुक्तांना दिली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांना अडवण्याची जबाबदारी पोलिसांची होती; परंतु पोलीस भाजपच्या मिठाला जागले, असा स्पष्ट आरोप शिवसेनेचे विभागीय नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.