गद्दारांच्या राज्यात महाराष्ट्र अधोगतीला!, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

महाराष्ट्रात गद्दारी झाल्यानंतर खोके घेतलेल्यांपैकी कुणी वाईन शॉप्सची रांग लावली, कुणी बहात्तराव्या मजल्यावर फ्लॅट घेतला, कुणी डिफेंडर गाडी घेतली; पण तरुणांच्या हाताला काम देणारा रोजगार महाराष्ट्रात आला नाही. दोन वर्षांत गद्दारांची प्रगती झाली पण महाराष्ट्र अधोगतीला गेला, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. हाताला काम न देणाऱ्या खोकेबाजांना आगामी निवडणुकीत कायमचे गाडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पैठण, लासूर स्टेशन, वैजापूर येथे शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पैठण येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी गद्दारांचा नामोल्लेख टाळून तुफान टीका केली.

ज्यांनी भरभरून दिले त्या उद्धव ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत, ते तुमचे कसे होतील? अशा स्वार्थी खोकेबाजांचा बदला तर घ्यायचाच आहे, पण बदलही घडवून आणायचा आहे. पुढील 50 वर्षांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे तरुणांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विभागीय नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, आमदार उदयसिंह राजपूत आदींची उपस्थिती होती.

15 लाखांचे 1500 कसे झाले?

दहा वर्षांपूर्वी बँक खात्यात 15 लाख रुपये येणार होते. आता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 1500 रुपये सरकारने जमा केले आहेत. या सरकारला पुन्हा निवडून दिल्यास ते तुम्हाला 15 रुपयांचा चेक देतील. आम्हाला केवळ ‘लाडकी बहीण’ नको तर ‘सुरक्षित बहीण’ हवी आहे, असे आदित्य ठाकरे वैजापूर येथील जाहीर सभेत म्हणाले. महिलांवर अत्याचार करणारांना भर चौकात फाशी द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

मराठा आंदोलकांशी चर्चा

पैठण येथे आदित्य ठाकरे यांची रॅली सुरू असतानाच काही मराठा आंदोलक तेथे आले. आदित्य ठाकरे यांनी रॅली थांबवून या मराठा आंदोलकांशी चर्चा केली. त्यांचे निवेदन स्वीकारले आणि म्हणणे ऐकून घेतले.

महिला असुरक्षित, कायद्याचा धाक नाही

राज्यात महिला असुरक्षित आहेत. कायद्याचा धाक राहिला नाही. हे चित्र बदलण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मशालीला साथ द्या, असे आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी लासूर स्टेशन येथील जाहीर सभेत केले. महिलांचे रक्षण करण्यात मिंधे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला देशाची घटना बदलायची होती, परंतु जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आताही जनतेने सजग राहावे, असे ते म्हणाले.

भाजपचे आंदोलन कितपत योग्य?

राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. मिंध्यांच्या राज्यात चिमुरड्याही सुरक्षित नाहीत. पोलिसांनी वेळीच कारवाई करावी म्हणून काल पक्षविरहित आंदोलन करण्यात आले. यामध्ये कोणाचाही अनादर होईल असे काहीही घडले नाही. असे असताना भाजपने आज आंदोलन करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.