जगभरात ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ दिवसागणिक वाढत आहे. ई-कॉमर्स म्हणजे ऑनलाईन शॉपिंगमुळे आपला वेळ आणि साधनं वाचतात. मात्र त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याची चिंताजनक बाब समोर येतेय. एका अहवालानुसार ई-कॉमर्सच्या पॅकेजिंग साहित्यासाठी तब्बल तीन अब्ज झाडांची कत्तल होत असल्याची गंभीर बाब समोर आलीय.
अमेरिकेच्या काही विद्यापीठांनी ई-कॉमर्स आणि पर्यावरण नुकसार यावर अभ्यास केला आहे. त्या अभ्यासानुसार ऑनलाईन शॉपिंगमुळे लोकांचा वेळ वाचतो, जीवन आरामदायी होत असले तरी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्ची होते. परिवहन ग्रीनहाऊस उत्सर्जन वाढते. ई-कॉमर्ससह अन्य उद्योगांसाठी पॅकेजिंग साहित्याची गरज लागते. कागद, पुठ्ठा, लाकडाचा वापर केला जातो. साधारणपणे झाडांपासून हे साहित्य मिळते. ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढले की कागद आणि पुठ्ठ्यांची मागणी वाढते.
पॅकिंगसाठी कागद, पुठ्ठ्यांचा जास्त वापर
पॅकेजिंगच्या व्यतिरिक्त लाकडाचे फर्निचर, बांधकाम साहित्य, ग्राहकोपयोग वस्तू बनवल्या जातात. त्यासाठी दरवर्षी लाखो झाडे तोडली जातात. अनेकदा पॅकेजिंग सामग्रीचा केवळ एकदाच वापर होतो आणि ते फेकून दिले जाते. सिंगल युज पॅकेजिंगची मोठी गरज पडते. त्यामुळे झाडांवर अधिक प्रमाणात कुऱ्हाड चालवली जाते.
कसे होते पृथ्वीचे नुकसान
ऊर्जेचा अधिक वापर – ऑनलाईन सेवा, क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा सेंटर आणि स्ट्रिमिंग सेवांसाठी जास्त ऊर्जा खर्ची पडते. डेटा सेंटरला जास्त ऊर्जा लागते. त्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढते.
ई-कचरा – ऑनलाईन शॉपिंगसाठी स्मार्टफोन, लॅपटॉप अशा डिजिटल उपकरणांची गरज असते. ही उपकरणे जुनी झाल्यावर त्यांची नीट विल्हेवाट लावता येत नाही. त्यामुळे ई- कचऱयाचे प्रमाण वाढते.
खनिजाचा तुटवडा – इलेक्ट्रॉनिक डिवाईस बनवण्यासाठी लिथिअम, कोबाल्ट व अन्य खनिजांसाठी खाणकाम केले जाते. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांचे जास्त नुकसान होते.
ग्लोबल वार्मिंग प्लॅस्टिक कचरा, कार्बन उत्सर्जन या साऱ्यांचा परिणाम पर्यावरणावर होतो.