राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवदर्शनाबाबत वक्तव्य करत आस्तिक की नास्तिक असा वाद निर्माण करत टीका करणाऱ्यांना जबरदस्त टोला लगावला आहे. आपणही देवाचे दर्शन घेण्यासाठी जातो. मात्र, आपण त्याचा गाजावाजा करत नाही. देवदर्शनानंतर जे समाधान मिळते, ते प्रसिद्धीपेक्षा मोठे असते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. या एका वक्तव्याने कोणाचेही नाव न घेता प्रसिद्धी करून घेणाऱ्या नेत्यांना जबरदस्त टोला लगावला.
शरद पवार म्हणाले की, मी आस्तिक आहे की नास्तिक, याबाबत चर्चा होत असते. मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातो, पण मी त्याचा गाजावाजा करीत नाही. पांडुरंगाचे दर्शन घ्यायला गेल्याचे जगाला कळावे याला काही अर्थ नाही. मी देवाचे दर्शन घेतो आणि निघून जातो. याचे जे मानसिक समाधान असते ते प्रसिद्धीपेक्षा मोठे असते, असेही ते म्हणाले. वारकरी संमेलनातून समाजमन तयार करणे आणि ते पुरोगामी विचारावर आधारित असणे गरजेचे आहे. ज्यांनी सामाजिक ऐक्य घडविणे, कर्मकांड, जुन्या प्रवृत्ती याविरोधात भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. तेच जात, पात, धर्म याची एक वेगळी भूमिका जनमानसासमोर मांडतात आणि त्यामुळे सामाजिक ऐक्याला धक्का बसत असेल तर तो वारकरी सांप्रदायाचा विचार नाही, असेही त्यांनी सांगितले.
संतांनी आपल्याला प्रचंड वैचारिक धन दिले आहे. त्यातून एक विचारावर आधारित सामंजस्य निर्माण करणारे मैत्री भाव विस्तारित करणारा जनमानस तयार करण्याची आवश्यकता आहे. जगात आज शांतता आणि बंधुभावाची गरज आहे आणि त्याची पूर्तता करण्याची ताकद माऊली आणि तुकोबांच्या विचार, अभंगात आहे, असेही त्यांनी सांगितले.