शेतकरी आंदोलनासंदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री-राजकारणी कंगना राणावतला भाजपच्या नेतृत्वानं चागलंच फटकारल्याचं वृत्त आहे. प्रत्येक गोष्टींवर विविशेत: पक्षाच्या धोरणात्मक विषयांवर बोलणं योग्य नाही, असं म्हणत तिची कानउघडणी करण्यात आली आहे.
कंगनाच्या वक्तव्यामुळे देशभरातील शेतकरी संघटनांनी रोष व्यक्त केला असून भाजप अडचणीत आली आहे. इतकेच नाही तर त्यांना पत्रक काढून स्पष्टीकरण करण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे भाजपनं हे वक्तव्य कंगनाचं वैयक्तिक मत असून पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही म्हणत हात झटकले आहेत.
कंगना राणावत यांनी केलेल्या विधानाशी पक्षाचा संबंध नसून त्यांच्या मताशी पक्ष सहमत नसल्याचं पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे.
सरकारने ठोस पावले उचलली नसती तर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हिंदुस्थानात बांगलादेशसारखे संकट उद्भवले असते, तसेच या आंदोलनात महिलांवर अत्याचार झाल्याचं विधान कंगनानं केलं होतं.
यावर ‘कंगना रणावत यांना पक्षाच्या वतीने धोरणात्मक बाबींवर बोलण्याचा अधिकार नाही आणि त्यांना तसे करण्याची परवानगीही देण्यात आलेली नाही. राणावत यांनी भविष्यात अशी विधानं करण्यापासून स्वत:ला रोखावं असे निर्देश दिले आहेत’, असं भाजपच्या एका निवेदनातून म्हटलं आहे.