महिला पोलीस कर्मचाऱ्याची इंद्रायणीत उडी

आळंदीमध्ये इंद्रायणी नदीवरील पुलावरून महिला पोलीस कर्मचाऱ्याने नदीपात्रात उडी मारली. ही घटना रविवारी (25 रोजी) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. एकाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे नदीपात्रातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने ती वाहून गेली.

अनुष्का सुहास केदार (वय 20,रा.लक्ष्मीनारायणनगर, दिघी) असे नदीपात्रात उडी मारलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे. आळंदी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी याबाबत माहिती दिली. अनुष्का केदार या सन 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्या. सध्या त्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या. त्यांनी रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास आपल्या एका मित्राला कॉल करून मी आळंदी येथे इंद्रायणी नदीत आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून त्यांनी नदीत उडी मारली. त्या नदीत उडी मारत असताना काहीजणांनी आरडाओरडा करीत त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी उडी मारली. अनुष्का यांना वाचविण्यासाठी एकाने नदीपात्रात उडी घेतली. मात्र, पावसामुळे नदीपात्रातील पाण्याला प्रचंड वेग असल्याने त्या वाहून गेल्या. त्यांनी नेमकी कोणत्या कारणावरून नदीत उडी मारली, हे अद्यापि समजू शकले नाही.

अनुष्का केदार यांना नदीत शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र, नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.