
लातूर जिल्ह्यातील मुरुड पोलीस ठाणे व किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दी मध्ये रात्रीच्या वेळी सोलार पॅनलचे केबल वायर चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे मुरुड व किनगाव येथे चोरीचे अज्ञात आरोपी विरुद्ध सोलार वायर चोरीचे तीन गुन्हे दाखल झाले होते.
काही गुन्हेगार चोरी करण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पोलीस ठाणे मुरुड हदीमध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीची खातरजमा करून सदरचे पथक पोलीस ठाणे आधी मधील तांदूळजा गावामधून चारचाकी वाहनासह संशयित आरोपींना ताब्यात घेतले. शिवाजी बाप्पा काळे, वय 29 वर्ष राहणार कासार खणी ता. वाशी, धाराशिव. मुरलीधर अन्सरा काळे, वय 45 वर्ष राहणार कासारखणी ता. वाशी, धाराशिव सद्या रा. भगवानबाबा चौक, शिंदे प्लोटिंग, परळी रोड,अंबाजोगाई जिल्हा.बीड यांचा त्यात समावेश होता. त्यांच्या ताब्यात असलेल्या बोलोरो जीपची व त्यांची झडती घेतली असता दोघांकडे तीन लाख रुपये मिळून आले. नमूद रकमेबद्दल त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्याच्या इतर साथीदारासह मिळून काही महिन्यापासून पोलीस ठाणे मुरुड व पोलीस ठाणे किनगाव हद्दीतील मोकळ्या जागेत असलेल्या मोठ्या सोलार पॅनलचे केबल वायर कट करून त्याची चोरी केल्याचे सांगून त्याच्या आणखीन एका साथीदाराने सदरचे केबल वायर जाळून त्यामधील कॉपर भंगार मध्ये विकल्याचे व त्यामधून मिळालेल्या दोघांच्या हिश्याला आलेली रक्कम असल्याचे सांगितले.
त्यावरून नमूद आरोपीना त्यांनी चोरलेला व त्यांच्या आणखीन एक साथीदाराने सोलार पॅनलचे चोरलेले केबल वायर जाळून त्यामधून निघालेला कॉपर भंगारात विकल्यावर आलेल्या रक्कम व गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा बोलेरो जीप असा एकूण 06 लाख रुपयाच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन सोलार पॅनलचे केबल वायर चोरीचे लातूर जिल्ह्यातील तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत तसेच त्यांनी धाराशिव व बीड जिल्ह्यातही सोलर पॅनलचे केबल वायर चोरीचे तीन गुन्हे केल्याचे कबूल केले. दोघांनाही पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे मुरुड यांचे ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या सोबतच्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उप-निरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार रामहरी भोसले, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, नानासाहेब भोंग, राजेश कंचे, सुरेश कलमे पोलीस चालक अमलदार प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.