कंगनाच्या बेताल वक्तव्याविरोधात शेतकरी संतप्त; शेतकरी नेते अजित नवले यांनी केला निषेध

kangana-ranaut-ajit-navale

अभिनेत्री खासदार कंगनाच्या बेताल शेतकरी विरोधी वक्तव्याचा तीव्र निषेध असून शेतकऱ्यांचा त्यांनी अपमान केला आहे, असं वक्तव्य डॉक्टर अजित नवले यांनी केलं आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर बलात्कार झाले. हे आंदोलन चीनने घडवून आणले होते व या आंदोलनाच्या आडून देशात बांगलादेश घडवण्याचे षड्यंत्र होते, अशा प्रकारचे अत्यंत बेताल वक्तव्य कंगना राणावत यांनी केले आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या 600 पेक्षा जास्त शेतकरी शहिदांचा, आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो हजारो शेतकरी माता भगिनींचा व देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांचा हा घोर अपमान आहे, असं नवले म्हणाले.

कंगना राणावत यांनी यापूर्वी सुद्धा शेतकरी आंदोलनाबद्दल अशाच प्रकारची बेताल वक्तव्य केली आहेत. स्वातंत्र्य संग्रामाबद्दल सुद्धा अशाच प्रकारची बेताल वक्तव्य यापूर्वी त्यांच्याकडून करण्यात आली आहेत, असं नवले यांनी सांगितलं.

कंगना राणावत करत असलेली वक्तव्य या देशातील स्वातंत्र्य युद्ध आणि या देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलने बदनाम करण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे, असा आरोप नवले यांनी केला आहे. या षडयंत्रामागे असणाऱ्या शक्तींचा देशभरातील शेतकरी, शेतकऱ्यांची पोरं आणि या देशावर प्रेम करणारे नागरिक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहेत, असं नवले यांनी म्हटलं आहे.