नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं दिर्घ आजाराने निधन

नांदेडचे खासदर वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. गेल्या महिनाभरापासून चव्हाण यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

नायगाव ग्रामपंचायतचे सरपंच ते नांदेड लोकसभेचे खासदार होण्यापर्यंतचा प्रवास त्यांचा संघर्षमय राहिला आहे. 1978 साली ते पहिल्यांदा नायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून निवडून आले. ते सलग 24 वर्ष सरपंच होते. त्यानंतर त्यांनी मागे पाहिले नाही. 1990 ते 2002 पर्यंत ते नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिती नायगावचे सभापती होते. 2002 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. विधानपरिषदेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर चव्हाण यांनी 2009 ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली व ते जिंकलेही. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व विधानसभा निवडणूक लढवली. 2024 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली व ते मोठ्या मताधिक्क्याने जिंकले.