यूपीएस–योजनेतील ‘यू’चा अर्थ मोदी सरकारचा यू–टर्न; मल्लिकार्जुन खरगे यांचा एनडीएवर घणाघात

जुन्या पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत देशभरात सरकारविरोधात आंदोलने सुरु असताना एनडीए सरकारने युनिफाइड पेन्शन स्कीम आणण्याचा निर्णय घेतला. यावरून विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून यूपीएसमध्ये ‘यू’ चा अर्थ यू-टर्न आहे. 4 जूनच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधानांच्या सत्तेच्या अहंकाराला जनतेने जागा दाखवली, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एनडीए सरकारवर घणाघात केला आहे.

सरकारने आधी अर्थसंकल्पात लॉँग टर्म पॅपिटल गेन/इंडेक्सेशनचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर ब्रॉडकास्टिंग बिल, यूपीएससीमध्ये लॅटरल एंट्रीचा निर्णयही मागे घेतला याकडेही खरगे यांनी लक्ष वेधले. सरकारला या सर्वांची उत्तरे द्यावीच लागतील. 140 कोटी हिंदुस्थानींचा सरकारकडून बचाव करत राहणार असेही खरगे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने 24 ऑगस्ट रोजी नव्या पेन्शन योजनेच्या जागी युनिफाइड पेन्शन योजना आणली.

भाजपा आता भानावर आली -आप

नवीन पेन्शन योजना तसेच विविध योजनांना देशभरातून कडाडून विरोध झाल्यानंतर भाजपा भानावर आल्याचा टोला आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज यांनी लगावला आहे. विरोधक जे बोलत होते ते बरोबरच होते हेदेखील यामुळे सिद्ध झाल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकार केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांवर अन्याय करत होती. त्यामुळे पेंद सरकारच्या कर्मचाऱ्यांनी भाजपाविरोधात मतदान केले. त्यामुळे भाजपचे डोके ठिकाणावर आल्याचेही भारद्वाज यांनी म्हटले आहे.

यूपीएसद्वारे सरकार संभ्रम निर्माण करत आहे– काँग्रेस

सरकारने जे काम आधीच करायला हवे होते ते काम दबावात येऊन केल्याचे काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी म्हटले आहे. सरकारने पेन्शनप्रकरणी कोणताही निर्णय घेऊ नये हे विरोधी पक्ष आधीपासूनच सांगत होता. निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाचे 50 टक्के नाही, तर पूर्ण 100 टक्के मिळायला हवेत. जे कर्मचारी देशासाठी काम करून निवृत्त होतात अशा कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घोषणा केली आणि यूपीएस योजनेद्वारे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही राशिद अल्वी यांनी केला. दरम्यान, जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवली.