कल्याण, तारापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार; भय इथले संपत नाही… ‘लाडक्या बहिणी’चा आक्रोश

बदलापूर, अंबरनाथ, मीरा रोड, वसई-नायगावपाठोपाठ कल्याण आणि तारापूरमध्येही अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. कल्याणच्या दहा वर्षांच्या आणि तारापूरच्या बारा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा सख्ख्या शेजाऱ्यांनीच घात करून त्यांच्या अब्रूवर घाला घातला. याप्रकरणी दोन्ही नराधमांना पोलिसांनी ‘पोक्सो’ कायद्याखाली अटक केली आहे. ‘भय इथले संपत नाही’ असा  आक्रोश लाडक्या बहिणी करत असून त्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे रोज घडणाऱ्या या घटनांमधून समोर आले आहे.

कल्याण पूर्व येथील आडिवली परिसरात शाळेतून आल्यानंतर दहा वर्षांची अल्पवयीन मुलगी अंगणात खेळत होती. यावेळी शेजाऱ्याने मुलीला घरात बोलावले. मुलगी घरात येताच लंपटाने मुलीला जवळ बसवून लैंगिक चाळे केले. या प्रकाराने भेदरलेल्या मुलीने कशीबशी आपली सुटका करून घराकडे धाव घेतली आणि रडत रडत पालकांना घडला प्रकार सांगितला. पालकांनी त्वरित मुलीला सोबत घेऊन मानपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने लंपट धर्मेंद्र यादव याला अटक केली. आरोपीला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने आणि पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली.

कल्याणच्या घटनेनंतर तारापूरमध्येही 12 वर्षांची विद्यार्थिनी लैंगिक अत्याचाराच्या घटनेला बळी पडली. कुडन गावातील पीडित मुलगी दुपारी शिकवणी झाल्यावर घरी आली. यावेळी शेजारी राहणाऱ्या रामा बोये या आरोपीने फोन खराब झाल्याच्या बहाण्याने मुलीला घरी बोलावले. तिला बोलण्यात गुंतवून अनैतिक कृत्य केले. यावेळी मुलीने आरडाओरड करून आपली सुटका करून घेतली. घरी आल्यावर मुलीने आईवडिलांना नराधमाने केलेल्या कृत्याची माहिती दिली. यानंतर पालकांनी तारापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली. पोलिसांनी आरोपी रामा बोये याला अटक करून ‘पोक्सो’ गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर केले असता 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निवास कणसे यांनी दिली.