महिलांविरोधातील अपराध अक्षम्य असून या प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, त्याला शिक्षा व्हायलाच हवी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावात आपल्या भाषणात म्हणाले. परंतु एका सर्वेक्षण अहवालानुसार देशात दर 15 मिनिटाला 1 बलात्काराची घटना घडते. त्यामुळे नरेंद्र मोदी हे महिला सुरक्षेत फेल आहेत, अशा शब्दांत काँग्रेसने हल्ला चढवला
पंतप्रधान महिला सुरक्षेविषयी बोलतात. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चे नारे देतात; परंतु देशात महिला, लेकी किती सुरक्षित आहेत याची पोलखोल महिलांविरोधात होणारे गुह्यांचे आकडे करतात. देशात 10 वर्षांत महिलांविरोधात होणारे गुन्हे तब्बल 75 टक्क्यांनी वाढल्याचे धक्कादायक वास्तव अनेक सर्वेक्षणांतून समोर आले आहे. हेच आकडे सांगतात की, देशात दर 15 मिनिटाला एक बलात्काराची घटना घडतेय. दिवसाला जवळपास 86 बलात्काराचे गुन्हे दाखल होतात. कायदा बदलला; परंतु परिस्थिती तीच आहे याकडेही काँग्रेसने लक्ष वेधले आहे.
100 पैकी 27 जणांनाच शिक्षा
बलात्काराच्या प्रकरणांमध्ये 100 पैकी केवळ 27 जणांनाच शिक्षा होते. बाकीचे नराधम निर्दोष सुटतात. यावरून नरेंद्र मोदी महिला सुरक्षेच्या मुद्दय़ावरून पूर्णपणे फेल ठरले आहेत हेच समोर येते, अशा परखड शब्दांत काँग्रेसने पंतप्रधानांना आरसा दाखवला आहे.