पंडय़ाची विकेट पडणार! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हकालपट्टीची शक्यता

गेल्या मोसमातील दारुण कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स आयपीएलच्या नव्या मोसमापूर्वी हार्दिक पंडय़ाची विकेट काढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच आयपीएलचा मेगा लिलाव होणार असून त्यानंतर सर्व संघांचे चेहरे बदललेले दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सचा पराभव संघमालकांच्या जिव्हारी लागल्यामुळे ते संघात अनेक बदल करण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल कर्णधारपदाच्या बाबतीत होऊ शकतो. रोहित शर्मासह टीमचे अनेक खेळाडू हार्दिक पंडय़ाच्या कर्णधारपदावर खूश नाहीत. यासोबतच सचिन तेंडुलकरही सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्याच्या बाजूने आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मीडिया रिपोर्टस्नुसार, रोहितसोबत आलेल्या खेळाडूंनी मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाला अल्टिमेटम दिला आहे. रोहित आणि सचिनसह अनेक खेळाडूंना पंडय़ाने कर्णधारपदी राहावे असे वाटत नाही. मात्र, तरीही मुंबईने हार्दिकला कर्णधारपदावर कायम ठेवले तर रोहित आणि सूर्याशिवाय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही संघ सोडू शकतो. यामुळे मुंबई कॅम्पमध्ये सध्या खळबळ उडाली आहे.

पंडय़ाच्या कर्णधारपदाचा डाव अंगलट

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 2024 हंगामात हार्दिक पंडय़ाला गुजरात टायटन्समध्ये ट्रेड केले आणि त्याला संघात परत आणले. यानंतर हंगाम सुरू होण्यापूर्वीच मुंबईने रोहितला हटवून पंडय़ाला संघाचा कर्णधार बनवले. मात्र, पंडय़ाच्या कर्णधारपदाचा हा डाव त्यांच्या चांगलाच अंगलट आला. मुंबईने या निर्णयाबाबत रोहितला कोणतीही माहिती दिली नाही. त्याचा परिणाम आयपीएलमधील मुंबईच्या कामगिरीवरही झाला. या घडामोडींमुळे रोहित आणि त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले होते. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये पंडय़ाला कर्णधारपदावरून हटविण्याचा मुंबई इंडियन्स गंभीरपणे विचार करत आहे. असे घडले तर सूर्यकुमार यादवच्या गळय़ातही कर्णधारपदाची माळ पडू शकते.