Yavatmal News – गतिमान प्रशासनाचा अजब नमुना, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या दिवशी काढली कामाची निविदा

>>प्रसाद नायगावकर

मिंधे सरकार हे लोकहितासाठी गतीमान सरकार आहे असा नेहमीच दावा करीत राहते. पण या गतिमान प्रशासनाचा अजब नमुना समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रसारासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम घेण्यात आला. लाडक्या बहिणीसाठी पिण्याचे पाणी पुरवायचे या करीत निविदा काढली. मुख्य म्हणजे ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता त्याच दिवशी कामाची निविदा एका खाजगी वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात आली. त्यामुळे हे सरकार लोकहितासाठी की, सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी गतिमान आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यवतमाळमध्ये शनिवारी (25 ऑगस्ट) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आणि महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम पार पडला. आर्णी मार्गावरील किन्ही येथे एक भव्य मंडप उभारून सरकारी पैश्यातून हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी जवळपास 50 हजार महिला येतील असा दावा मिंधे सरकार करीत होते. या महिलांकरिता 50 हजार लिटर शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्याचा आणि राखीव म्हणून 50 हजार लिटर पाणी असे सुमारे एक लक्ष लिटर पाणी पुरविण्याचे कंत्राट देण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकारण अमरावती यांच्याकडे देण्यात आली होती. यांच्याकरिता अंदाजे 9.26 लाखाची अंदाजित रक्कम सांगण्यात आली. पण ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच दिवशीच्या एका वृत्तपत्रातून ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली. म्हणजेच वायुवेगाने काम करीत महाराष्ट्र जीवन प्राधिकारण विभागाने सीलबंद निविदा मागवून, आलेल्या निविदा बघून आणि कंत्राटदारास वर्क ऑर्डर देऊन त्या कंत्राटदाराने अवघ्या काही मिनिटात कार्यक्रम स्थळी महिलांसाठी पाणी पुरवठा केला. मिंधे सरकारच्या कामाची गती ही वाखाणण्यासारखी आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे 1 लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या खर्च सुमारे 10 लाख रुपये कसा? म्हणजेच सर्व गौडबंगाल आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना म्हणजे  “मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी ” म्हणून ही योजना सरकारने आणली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना राजकीय उद्देशानेच जाहीर केल्याने मुळात ही योजनाच फसवी आहे, सरकारी तिजोरीतून खर्च करून मोठमोठे कार्यक्रम घ्यायचे आणि पैशांचा अपव्यय करायचा, असे सरकारी धोरण  आहे. एकीकडे महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनात सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे आणि हे सरकार मात्र मूग गिळून बसले आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या पार्टीचा प्रचार व प्रसार होण्यासाठी असे कार्यक्रम घ्यायचे. एकीकडे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे जे पिकांचे नुकसान झाले त्याची मदत करायला सरकारजवळ पैसे नाहीत, पण यवतमाळच्या या कार्यक्रमात जवळपास 17 कोटी रुपये खर्च केले. लोकसभेत जसा या सरकारला याच बहिणींनी घराचा रस्ता दाखविला तसाच येणाऱ्या विधानसभेत दाखवतील यात काही संशय नाही, असा विश्वास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, युवा काँग्रेस नेते राहुल ठाकरे यांनी व्यक्त केला.