राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटामध्ये पडलेली दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मातीसोबत रस्त्यावर आलेले मोठमोठे दगड हटविण्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही अनुसकुरा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंदच आहे. शनिवारी पहाटे अणुस्कुरा घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती.नागमोड्या वळणांचा आणि उताराचा असलेल्या अणुस्कूरा घाटमार्गातून सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.
शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घाटामध्ये दरड कोसळली. त्यामध्ये मातीच्या ढिगार्यासह मोठमोठे दगड रस्त्यात आल्याने मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे रविवारी दुसऱ्या दिवशीही घाटमार्गातील वाहतूक ठप्पच होती. बंद झालेला घाटमार्ग मोकळा करण्यासाठी शनिवार सकाळपासून बांधकाम विभागातर्फे अथक प्रयत्न सुरू आहेत. जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने माती बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मातीच्या ढिगार्याखाली मोठमोठे दगड असल्याने रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यामध्ये अद्याप यश आलेले नाही. काळोख आणि जोरदार पावसामुळे शनिवारी रात्री काम बंद ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली. रस्त्यात आलेली माती बाजूला करण्यात आली तरी दगड हटविणे शक्य होत नाही आहे. दगड फोडण्यासाठी ब्रेकरचाही उपयोग करण्यात आला आहे. मात्र तरीही सायंकाळी उशिरापर्यंत पूर्णपणे दगड बाजूला करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद होता.