बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 10 विकेटने पराभव करत इतिहास रचला आहे. बांगलादेशने पहिल्यांदाच कसोटीमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा त्यांच्याच घरात 10 विकेटने पराभव करणारा बांगलादेश क्रिकेट इतिहासातील पहिला संघ ठरला आहे.
रावळपिंडी येथे पार पडलेल्या या सामन्यामध्ये बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव 6 गड्यांच्या मोबदल्यात 448 धावांवर घोषित केला. तर बांगलादेशने आपला पहिल्या डावात सर्व विकेट गमावत 565 धावा केल्या. मात्र पाकिस्तानला दुसऱ्या डावात बांगलादेशच्या गोलंदाजांनी झटपट गुंडाळले आणि पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या 146 या धावसंख्येवर आटोपला. त्यामुळे बांगलादेशला जिंकण्यासाठी फक्त 30 धावांची आवश्यकता होती. बांगलादेशने 30 धावांचे लक्ष सातव्या षटकात पूर्ण केले आणि 10 विकेटने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला.
बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत 13 कसोटी सामने झाले आहेत. दोन्ही संघांमध्ये पहिली कसोटी मालिका 2001-2002 मध्ये झाली होती. ही मालिका पाकस्तानने 2-0 अशी जिंकली होती. त्यानंतर उभय संघांमध्ये 4 कसोटी मालिका झाल्या मात्र बांगलादेशला एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता.