बनावट नोटा बाजारात खपविण्याप्रकरणी आणखी दोघांना कर्नाटकातून अटक करण्यात आली असून, एकूण 62 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती करमाळा उपविभागाचे पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली.
लक्ष्मीकांत शंकरआप्पा अळगी (वय 32, रा. समर्थनगर अक्कलकोट, जि. सोलापूर) व सागर मच्छिंद्र बारवकर (वय 34, रा. देऊळगाव गाडा, ता. दौंड) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आता करबसय्या वीरभदय्या हिरेमठ (वय 39, रा. घुटुर्गी भटनूर, सिंदगी, जि. विजापूर) व मारुती हनुमंत हालकुरकी (वय 43, रा. सेक्टर 49, नवानगर प्लॉट 236 बागलकोट, कर्नाटक) यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने चौघांना 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रविवार (दि. 18) वेणेगाव येथे बनावट नोटा चलनात आणणाऱया अळगी बारवकर यांना अटक केली होती. तपासात शंभर रुपयांच्या 484 नोटा मिळून एकूण चार लाख 84 हजार चारशे रुपये मिळून आले होते. दोघांचे कर्नाटक कनेक्शन मिळून आले होते. त्या राज्यातील बागलकोट जिह्यात नवानगर भागात नोटा दिल्या होत्या, असे त्यांनी सांगितल्याने पोलिसांनी तेथे जाऊन माहिती घेत हिरेमठ व हालकुरकी यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून 62 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित मोरे, विलास रणदिवे, संदीप गिरमकर, प्रवीण साठे, चेतन पवार, कोंडीबा मेहर, शुभम शिंदे यांनी ही कारवाई केली.