श्रावण मासपर्व सुरू असून, आज श्रावणातील तिसरा शनिवार असल्याने श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर भाविकांनी गजबजून गेले. पहाटेपासून भाविकांच्या गर्दीचे लोंढे मंदिराकडे येत होते. तसेच परिसरातील पायी येणाऱया भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. महाद्वारपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या. वाढत्या गर्दीमुळे शनि चौथऱयाजवळ भाविकांनी रेटारेटी केल्यामुळे गोंधळ दिसून आला. दिवसभरात लाखो भाविकांनी शनिदर्शनाचा लाभ घेतला.
श्रावण पर्व कालखंडात तिसऱया वाराला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आज तिसऱया श्रावणी शनिवारी पहाटे पाच ते सात या वेळेत दोन हजार भाविकांनी शनि चौथऱयावर जाऊन शनिला जलाभिषेक व तेल अर्पण करून दर्शन घेतले. अभिषेक भावनात पुरोहितांच्या मंत्रोच्चारांत अभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. हजारो भाविकांनी शनिमहाराजांना तेल अर्पण करीत मनोभावे पूजा केली. वाढत्या गर्दीमुळे आज शनिमंदिर परिसरातील देवस्थान, वाहनतळ व खासगी वाहनतळ संपूर्ण हाउसफुल्ल झाले होते.
शिर्डीवरून येणाऱया भाविकांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. हजारो भाविक शुक्रवारी संध्याकाळी शनिमंदिरात मुक्कामी दाखल झाले होते. आज पहाटे शनि चौथऱयावर जाऊन हजारो भाविकांनी शनिमूर्तीला तेल अभिषेक केला.
अन्नदानाचे पुण्य मोठे
श्रावण महिन्यात शनिमंदिर परिसरात भाविकांना अन्नदान करण्याची मोठी परंपरा आहे. परिसरातीलच नव्हे, तर अन्य ठिकाणांहून आलेल्या भाविकांना अन्नदान करण्याचे पुण्यकर्म पार पडले जाते. हजारो भाविक आपआपल्या घरी पहाटे भंडारा बनवून मंदिर परिसरात भाविकांना वाटप करतात.