पालिकेच्या अभियांत्रिकी संवर्गात 1800 जागा रिक्त, पदे भरण्यास दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा

मुंबई महापालिकेतील अभियांत्रिकी संवर्गाची सुमारे 1800 पदे विविध प्रशासकीय कारणांनी रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असून पालिकेला नागरी सेवा पुरविताना अडचणी येत आहेत. त्यामुळे या रिक्त जागा तातडीने भरा अन्यथा जोरदार आंदोलन केले जाईल, अशा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिला आहे.

पालिकेच्या अभियांत्रिकी संकर्गात रिक्त असलेली सुमारे 1800 पदे भरण्यास दुर्लक्ष केले जाते आहे. तसेच कनिष्ठ अभियंता  (स्थापत्य, यांत्रिकी क विद्युत) या संवर्गातील देखील सुमारे 800 जागा रिक्त आहेत. यापैकी 20 टक्के रिक्त जागा खात्यांतर्गत भरती प्रक्रियेच्या माध्यमातून महापालिकेत कार्यरत कामगार, कर्मचाऱ्यांमधून भरण्याचे धोरण सन 2003 पासून उपयोगात आणले जाते, मात्र त्या जागा भरलेल्या नाहीत. आज महापालिकेतील याच संवर्गातील रिक्त पदे आणि त्याचा विभागीय स्तरावरील दैनंदिन कामकाजावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता, ही पदे तत्काळ भरणे आवश्यक आहे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका प्रशासनाकडे केली आहे. पालिकेतील गुणवत्ताधारक आणि कुशल कामगार, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन आणि विकासात्मक संधी देण्याच्या उद्देशाने 20 टक्के जागा गुणवत्तेवर आधारित धोरणानुसार सन 2009 पासून अंतर्गत भरतीसाठी परिपत्रक काढून अर्जदार कामगारांची निवड यादी निश्चित करून नियुक्ती करणे अशा प्रकारे अगदी सन 2019 पर्यंत जागा भरल्या गेलेल्या आहेत.

प्रशासनाची अनास्था

युनियन अर्हताधारक कामगार, कर्मचारी याकरिता संबंधित प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहेत. परंतु प्रशासन आडमुठेपणा घेऊन, प्रचलित धोरण बदलून, या 20 टक्के राखीक जागा भरतीच्या धोरणाला मूठमाती देण्याचा प्रयत्न करीत आहे. संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस संजय वाघ यांनी सदर प्रलंबित भरती प्रचलित पद्धतीने तत्काळ भरण्यासाठी गेल्या आठवडय़ात अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली.