आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून साधणार संवाद

शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे दोन दिवस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत असून, शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून ते शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे 25 आणि 26 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ रंगमंदिरात शिवसंकल्प मेळावा होईल.

सोमवार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पैठण येथे माहेश्वरी धर्मशाळेत, त्यानंतर दुपारी 12.15 वाजता लासूर स्टेशन येथे लक्ष्मीनारायण लॉन्स येथे शिवसंकल्प मेळावा होणार आहे. दुपारी 2 वाजता वैजापूर येथे, त्यानंतर सायंकाळी सहा वाजता कन्नड येथे शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे संवाद साधणार आहेत. या मेळाव्यास शिवसेना पदाधिकारी, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना विभागीय नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड यांनी केले आहे.