पश्चिम महाराष्ट्रात सरकारविरोधात संतापाची लाट, ऐतिहासिक बिंदू चौकात कोल्हापूरकर एकवटले

बदलापूर, कोल्हापूर, मुंबईसह राज्यात लहान मुली, तसेच महिला अत्याचारांच्या शिकार होत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिला अत्याचारांत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेल्या मूक आंदोलनात आज ना घोषणा, ना भाषण तरीही ऐतिहासिक बिंदू चौकात एकवटलेल्या कोल्हापूरकरांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट दिसून आली.

आज सकाळी ऐतिहासिक बिंदू चौकात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोंडाला, तसेच दंडाला काळ्या फिती बांधून महिलांवर अत्याचार करणाऱ्या दोषींवर तत्काळ कडक कारवाई करण्यात निष्क्रिय ठरलेल्या महायुती सरकारचा निषेध केला. खासदार शाहू महाराज छत्रपती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष-आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन झाले.

…तर सर्वांनाच बंद पुकारण्यास मनाई करा! – शाहू महाराज छत्रपती

माध्यमांशी संवाद साधताना खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी, ‘न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. पण न्यायालयाने आणि सरकारने अशा प्रकारे सर्वांनाच बंद पुकारण्यास मनाई करावी,’ असे सूचित केले.

राहुरीत शिवसेनेचे मूक आंदोलन

बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीतील शनिमंदिरासमोर तोंडाला काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख भागवत मुंगसे, सुनील शेलार, दीपक पंडित, पोपट शिरसाट, रमेश खुळे, विजय शिरसाट, सुरेश काचोळे, आदिनाथ करपे, काकासाहेब शिंदे, बाळासाहेब शिंदे, राहुल चोथे, भरत धोत्रे, नंदू हरिश्चंद्रे, हमीद पटेल, राहुल चोथे, राजू कासार, रमजान शेख, माऊली बेलदार, कुंदन जगधने, सुरेश काचोळे, सचिन क्षीरसागर, बाबा पाटोळे, भारत पिंपळे, भारत पवार आदी उपस्थित होते.

कोरेगाव, वडूजमध्ये शिवसेनेचे आंदोलन

कोरेगाव तालुक्यात शिवसेनेच्या वतीने बदलापूर घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी कोरेगाव तहसीलदार सगमेश कोडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख सचिन झांजुरणे, तेजस शशिकांत शिंदे, दत्ताजीराव बर्गे यांच्यासह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

माळशिरसमध्ये काळे झेंडे दाखवले

शिवसेनेच्या वतीने काळ्या फिती बांधून व काळे झेंडे दाखवून बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यात आला. युवासेना जिल्हा युवा अधिकारी गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातील संगम येथे निषेध करण्यात आला. यावेळी साक्षी भिसे, महादेव बंडगर, बाभूळगावचे सरपंच भूषण पराडे-पाटील, जय पराडे, गणेश गाडेकर, सतीश काकडे, मेघराज ताटे, आकाश गवळी, ऋषी पराडे, कल्याण इंगळे, नरा इंगळे, अशोक पराडे, इंद्रजित माने, बबन पवार, सचिन ताटे, लाला भोई, गणेश काळे, राजाभाऊ पराडे, बबन पराडे, नवनाथ इंगळे, प्रशांत पराडे, अमोल भोई, ओम पराडे, सिदू गायकवाड, किरण घाडगे, उमेश घोडके आदी उपस्थित होते.