‘फाशी द्या फाशी द्या… नराधमाला फाशी द्या’, ‘शक्ती कायदा झालाच पाहिजे’, ‘नको आम्हाला पंधराशे…’, ‘चिमुरडीला न्याय द्या, नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘बेशरम मिंधे सरकार चले जाव’, अशा गगनभेदी घोषणांनी आज शिवसेना भवनाचा परिसर दुमदुमला. निषेधाच्या काळय़ा पट्टय़ा बांधलेले शिवसैनिक आणि शिवसेनेच्या असंख्य रणरागिणींच्या मनात मिंधे सरकारच्या विरोधात फुललेला अंगार भरपावसातही शांत होत नव्हता.
बदलापूरमधील दोन बालिकांवरील अत्याचाराच्या विरोधात शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी तोंडाला आणि हाताला काळय़ा फिती लावून अतिशय तीव्र आंदोलन केले. राज्यातील बालिका, लहान मुली आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्या रोषाचा आणि संतापाचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे निष्क्रिय सरकारच्या विरोधात शिवसेना भवनासमोर पुकारण्यात आलेल्या आंदोलनात शिवसैनिक तसेच महिला आघाडीच्या रणरागिणी होत्याच, पण सर्वसामान्य महिला, तरुणी व गृहिणींनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सरकारच्या विरोधातील असंतोषाला वाचा फोडली.
या आंदोलनासाठी शिवसेना भवनाच्या बाहेरच मोठे व्यासपीठ बांधण्यात आले होते. व्यासपीठावर काळय़ा रंगातील बॅनर लावला होता. त्यावर लेकीबाळींवर अत्याचार करणाऱ्यांचा, त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा, कायदा-सुव्यवस्थेची वाट लावणाऱ्या असंवेदनशील सरकारचा निषेध… निषेध… निषेध असे ठळकपणे नमूद केले होते. सकाळपासून मुसळधार पावसाला आणि सोसाटय़ाच्या वाऱ्याला सुरुवात झाली, पण पाऊस आणि वारा अंगावर झेलत शिवसैनिक शिवसेना भवनासमोर पावसाची तमा न बाळगता पाय रोवून ठामपणे उभे होते.
काळे झेंडे दाखवून निषेध
मिंधे सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसैनिक तोंडाला आणि हाताला काळय़ा पट्टय़ा बांधून आले होते. हातात काळे झेंडे होते. अनेक शिवसैनिक काळे शर्ट आणि डोक्यावर काळय़ा पट्टय़ा बांधून होते. शिवसेनेच्या रणरागिणी काळय़ा साडय़ा परिधान करून आल्या होत्या, तर तरुणींनी काळे टॉप आणि काळय़ा जिन्स घातल्या होत्या.
‘कंसमामा’च्या विरोधात संताप
शिवसैनिकांनी सरकारच्या विरोधात दिलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ‘फाशी द्या फाशी द्या, नराधमाला फाशी द्या’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’. महायुती सरकारमधील ‘कंसमामा’च्या विरोधातील संताप यावेळी उफाळून आला. कंसमामाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा सुरू होत्या. काही काळासाठी पावसाचा जोर वाढत गेला तसा शिवसैनिकांमध्ये जोर आणि संतापही वाढत गेला.