चीन आता थेट चंद्रावरून आणणार हेलियम

चीन चंद्रावरून हेलियम आणण्याची तयारी करीत आहे. यासाठी चिनी शास्त्रज्ञांनी मॅग्नेटिक स्पेस लाँचर बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या लाँचरचे वजन 80 मेट्रिक टन म्हणजेच जवळपास 800 क्विंटल असणार आहे. याची किंमत 1.5 लाख कोटी रुपये असेल, अशी माहिती शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ सॅटेलाइट इंजिनीअरिंगच्या संशोधकांनी दिली.

हीलियम-3 न्यूक्लियर फ्यूजन हा स्वच्छ ऊर्जा मिळविण्याचा एक जबरदस्त मार्ग आहे. केवळ 20 टन हेलियम-3 हे चीनची वर्षभराची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेसे ठरू शकते. हे लाँचर कधीपर्यंत तयार करण्यात येईल, याबद्दल मात्र चीनकडून अद्याप सांगण्यात आले नाही.

या मोहिमेसाठी रशिया आणि चीन संयुक्तरीत्या एकत्रित येऊ शकतात. कारण, दोन्ही देशांनी 2035 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन केंद्र बांधण्याचा प्रस्तावही ठेवला होता. लाँचर कार्य करण्यासाठी फक्त वीज वापरण्यात येणार असून ही आण्विक आणि सौर स्रोतांकडून मिळणार आहे.