Mumbai News – मालाडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या, मालवणी पोलिसांकडून पतीला अटक

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना मालाडमधील मालवणी परिसरात घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःहून मालवणी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत पतीविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. इंतेखाक इद्रिस अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. तर आयेशा अखिल शेख असे मयत पत्नीचे नाव आहे.

मालाडमधील अंबुजवाडी येथील मोन्या मशिदीजवळ शनिवारी सकाळी 6 वाजता ही घटना घडली. आयेशा हिचा इंतेखाकसोबत दुसरा विवाह होता. मात्र दुसऱ्या विवाहानंतरही आयेशा पहिल्या पतीच्या संपर्कात होती. यावरुन इंतेखाक आणि आयेशा यांच्यात वारंवार वाद होत होते. शनिवारी सकाळीही त्यांच्यामध्ये वाद झाले. याच वादातून इंतेखाक धारदार चाकूने आयेशाच्या मानेवर वार केले. यात आयेशा गंभीर जखमी झाली.

पत्नीवर वार केल्यानंतर इंतेखाकने मालवणी पोलीस गाठले आणि आपल्या कृत्याची पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता आयेशा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी तिला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास मालवणी पोलीस करत आहेत.