शेतकर्यांची कर्जमुक्ती 30 सप्टेंबरच्या आत करा, 30 सप्टेंबरच्या आत कसं काय कर्जमाफी करत नाही, बघतोच, असा इशारा देत सरकारला नवा अल्टीमेटम मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले की, 30 सप्टेंबरच्या आतच सरकारने कर्जमुक्ती करून पीकविम्यासह अनुदानाचा विषय क्लिअर करावा. जर सरकारने हा विषय क्लिअर केला नाही तर राज्यातील शेतकर्यांना, सर्व जाती धर्मातील लोकांना, मराठ्यांना सांगतो की, एक शिक्का मतदान चालायचं, शंभर टक्के मतदान चालवायचे आणि या सरकारला घरी पाठवायचे, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले.
येत्या 29 तारखेला आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. माझ्या मायबाप मराठा समाजाने ताकदीने हे आंदोलन लाऊन धरले होते. त्यामुळेच आंदोलन यशस्वी झालं आहे. या यशाचं श्रेय हे मराठा समाजाच्या एकजुटीला आहे. त्यामुळे येत्या 29 तारखेला आंतरवलीत एक छोटेखानी चर्चा सत्र ठेऊ. कारण हे आंदोलन ऐतिहासिक झालेलं आहे. आंदोलनाचा लढा सर्वांनी यशस्वी केला आहे. त्याचे श्रेय सर्व गोरगरीब मराठा समाजाला आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
फुकट देत नाही
माझा मराठा समाज एकटाच 50-55 टक्के आहे. तुम्ही आमचे काम करा. तुम्ही सगळे प्रश्न काढून ठेवले आहेत. कामगारांचे प्रश्न, डॉक्टरांचे प्रश्न, वकिलांचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, पोलिसांचे प्रश्न, शहीद कुटुंबाचे सगळे प्रश्न अडकून ठेवलेले आहेत. सत्ता चालवत आहेत आणि गोरगरिबांचे रक्त पीत आहेत. फक्त थोडी चिरीमिरी देतात, आमच्या आयुष्याची सुविधा थोडीच देता. थोडेच देता आणि काढतात खूप. देताना तुम्ही तुमच्या खिशातून देत नाही, आमच्या टॅक्समधून पैसे काढूनच देता, असंही ते म्हणाले.
त्यांना उलटं टांगून हाणा…
तुम्ही लोकांच्या आयुष्यांचे वाटोळे करायला निघाले आहात का? तुम्ही शेतकर्यांना एक रुपयाचे कर्ज देऊ नका, आमच्या फक्त दोन-तीन गोष्टी द्या. आमच्या लोकांना कायमचं पाणी उपलब्ध करून द्या, लाईट द्या आणि आमच्या मालाला भाव द्या, तुमचे कर्ज, अनुदान तिकडेच ठेवा. सरकार कारण सुद्धा असं देतं की पीक विम्याचा प्रश्न हा कंपनीचा आहे; परंतु राज्य तुम्ही चालवताना ना? राज्य तुम्ही चालवता. तुमचं कंपन्यावरती नियंत्रण पाहिजे. कंपन्या ऐकत नसतील तर त्यांना उलटे टांगून हाणा. आमचे पैसे घ्यायला गोड लागतात कंपन्यांना आणि देताना त्यांना काय होतं? असे यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले.