गाडीत डिझेल भरल्यानंतर पैसे मागितल्याच्या कारणावरुन सात जणांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना सांगलीत घडली आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. टोळक्याच्या मारहाणीत कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
सांगली शहरापासून जवळच असलेल्या लातूर रोडवरील तात्या पेट्रोल पंपावर 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10.15 वाजता ही घटना घडली. एक काळ्या रंगाची महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी डिझेल भरण्याकरीता आली होती. गाडीचा चालक व मालक असलेले प्रथमेश जिवनराव कापसे याने पंपावरील कर्मचारी चंद्रकांत संतोष जाधव यास गाडीत एक हजार रूपयाचे डिझेल भरण्यास सांगितले.
डिझेल भरल्यानंतर कर्मचाऱ्याने पैसे मागितले असता “थांब तू मला ओखळत नाहीस का? गाडी बाजूला लावून फोन पे करतो” असे कापसे म्हणाला. परंतु कर्मचाऱ्याने “आधी पैसे द्या नंतर गाडी बाजूला घेऊन जा” सांगत पैसे मागितले. यामुळे कापसे संतापला आणि तू मला उलट बोलतो का असे म्हणत कापसे याने हातातील कडा चंद्रकांतच्या डोक्यात जोरात मारला. यानंतर कापसेने मित्रांना फोन लावून बोलावून घेतले.
कापसेचे पाच सहा मित्र स्कॉर्पिओ गाडीमधून पेट्रोल पंपावर आले आणि चंद्रकांतला शिविगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी चंद्रकांत जाधव याच्या फिर्यादीवरुन अहमदपूर पोलिसात भारतीय न्याय संहिता ( बि. एन.एस ) 2023 कलम 189(2), 191(2), 190, 352, 351(1), 351(2), 191(3), 118(1) नुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रथमेश जिवनराव कापसे, अर्जुन राठोड, कार्तिक राठोड, लखन पवार, अजित केंद्रे, अल्ताफ चाऊस, समीर शेख अशी आरोपींची नावे आहेत. पुढील तपास पोलीस निरिक्षक बी डी बुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश आलीवार करीत आहेत.