जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये चकमक, सुरक्षा दलाच्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. सोपोर पोलीस आणि 32 राष्ट्रीय रायफलच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये ही कारवाई करण्यात आली. सुरक्षा दलाकडून या परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरू आहे. परिसरात आणखी दहशतवादी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हिंदुस्थानी लष्कराने ट्वीट करत चकमकीची माहिती दिली. सोपोरच्या वाटरगाम परिसरात दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने ही कारवाई केल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांना शोधून ठार मारण्यासाठी पोलिसांसह लष्कर शोध मोहीम राबवत आहे. 19 ऑगस्ट 2024 रोजी दुडूच्या चील भागात दहशतवाद्यांनी संयुक्त पेट्रोलिंग पार्टीवर गोळीबार केला होता, ज्यामध्ये सीआरपीएफचे अधिकारी कुलदीप कुमार शहीद झाले होते.