
भारतीय जनता पक्षाचे नेता आणि माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने दुचाकीला उडवले. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसऱ्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जयकुमार गोरे हे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाटी येथील निवासस्थानातून आपला ताफा घेऊन बाहेर पडले. या ताफ्यातील गाडीने दहिवडीजवळील बिदाल शेरेवाडी जवळ एका दुचाकीला उडवले.
शनिवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. रणजीत मगर आणि अनिकेत मगर अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा अक्षरश: चेंदामेदा झाला.