
>> अनिल हर्डीकर
ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 84 व्या ते 91 व्या संमेलनांचे अध्यक्ष मोहन जोशी. यांनी एका डॉक्टरची आवर्जून भेट घेतली, कोणतीही तब्येतीची तक्रार नसताना. ते डॉक्टर म्हणजे डॉ. पार्थसारथी. ज्यांच्या हातून त्यांचा जन्म झाला अशा डॉक्टरांची ही भेट नक्कीच अतुलनीय ठरावी.
शंभरहून अधिक मराठी चित्रपट, ज्यात ‘तू तिथं’, ‘सवत माझी लाडकी’, ‘नशीबवान’, ‘आपली माणसं’ असे यशस्वी चित्रपट, 175 च्या जवळपास हिंदी चित्रपट, ज्यात ‘भूकंप’, ‘हिंमत’, ‘मजबूर’, ‘कालीचरण’, ‘मासूम’, ‘बारूद’ असे सरस यशस्वी चित्रपट, बंगाली (जीवनयुद्ध), कन्नड (मोक्ष), भोजपुरी (बिदाई आणि डॉक्टर बाबू) चित्रपट! पंचवीसहून कमी अधिक मराठी (एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका श्वासाचे अंतर, लाइफलाइन, धनंजय, अधांतर, एका लग्नाची तिसरी गोष्ट… इत्यादी ), तर 10 हिंदी मालिकांमध्ये (बंधन, साजिश, अभी तो मैं जवान हूँ, संतान) अभिनय आणि दीनानाथ मंगेशकर, पी. सावळाराम यांच्या नावाने अभिनयाच्या क्षेत्रातले पुरस्कार, सिनेगोअर्स, मातोश्री सु. ल. गद्रे पुरस्कार, विदर्भ भूषण पुरस्कार मिळवलेले, ‘मोरूची मावशी’, ‘नाथ हा माझा’, ‘गाढवाचं लग्न’, ‘घरोघरी हीच बोंब’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘कुर्यात सदा टिंगलम’, ‘करायला गेलो एक’, कथा कुणाची व्यथा कुणा’, ‘नातीगोती’, ‘पुरुष’, ‘श्री तशी सौ’, ‘कार्टी काळजात घुसली’, ‘कलम 302’, ‘थँक यू मिस्टर ग्लॅड’, ‘ती फुलराणी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘मी रेवती देशपांडे’ अशा व्यावसायिक मराठी नाटकांतून भूमिका केलेले कसलेले अभिनेते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 84 व्या ते 91 व्या संमेलनांचे अध्यक्ष म्हणजे मोहन जोशी. त्यांनी एका डॉक्टरची आवर्जून भेट घेतली, कोणतीही तब्येतीची तक्रार नसताना, जो किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे.
साल 1994. बेंगलोरच्या फाइव्ह स्टार हॉटेल ‘हॉलिडे इन’मध्ये ‘आंदोलन’ नावाच्या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मोहन जोशी उतरले होते. संजय दत्त, गोविंदा, दिव्या भारती असे सहकलाकार होते. आदल्या दिवशीच मोहनजींचं चित्रीकरण मनाजोगतं झालं. दुसऱ्या दिवशी मोहन जोशींना काही चित्रीकरण नव्हतं. ते हॉटेलात शांत बसले होते आणि अचानक त्यांच्या डोक्यात काही विचार आला. त्यांनी पुण्यात असलेल्या आपल्या आईला फोन लावला, “आई, मी मोहन! मी शूटिंगसाठी बंगलोरला आलोय. मला मलेश्वरला जायचंय.’’
“जाच आणि तिथे पोहोचलास की, मला फोन कर’’ मोहनजींची आई म्हणाली.
रिक्षा मलेश्वरला पोहोचली. आईला फोन लावला. तिने पुढचा रस्ता सांगितला. मोहनजी रिक्षावाल्याला त्याप्रमाणे सूचना करत गेले. अनेक चौक, वळणं, कधी डावीकडे, कधी उजवीकडे… रिक्षा पळत राहिली आणि आईने सांगितलेल्या एका पांढराशुभ्र रंग असलेल्या इमारतीसमोर उभी राहिली. अत्यंत अधीरतेने मोहनजी उतरले.
पुन्हा आईला फोन लावला, “आई, इथे
‘डॉ. पार्थसारथी’ अशी पाटी आहे. त्या पाटीसमोर मी उभा आहे.’’
“अगदी बरोब्बर’’ आई म्हणाली.
मोहनजी अंतर्बाह्य थरारले. ते हळूहळू चालत हॉस्पिटलमध्ये गेले, नाव सांगितलं. डॉ. पार्थसारथींची चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की, आता ते प्रॅक्टिस करत नाहीत, घरीच असतात. मोहनजींनी विनंती करून डॉक्टरांच्या घराचा पत्ता घेतला.
रिक्षात बसून मोहनजी डॉ. पार्थसारथी यांच्या घराच्या दिशेने निघाले. थोडय़ाच वेळात रिक्षा त्यांच्या घरासमोर थांबली. मोहनजी उतरले. बंगला टुमदार होता. बंगल्याभोवती छानशी बाग. सर्वत्र शांतता. मोहनजींनी बेल वाजवली.
कुणीतरी दरवाजा उघडला. आपण डॉ. पार्थसारथी यांना भेटण्यासाठी मुद्दाम आल्याचं मोहनजींनी सांगितलं. मोहनजी हॉलमध्ये बसले. हॉलचा रंग, एकंदर सजावट जुन्या पद्धतीची, पण खानदानी होती. डॉ. पार्थसारथी आतून आले. मोहनजी उठून उभे राहिले. डॉक्टरांना पाहात राहिले. डॉक्टर वृद्ध झाले होते. तरीही धन्वंतरी असण्याचे तेज चेहऱ्यावर विलसत होतं. डॉक्टर त्यांच्या चष्म्याआडच्या मोठय़ा डोळ्यांनी मोहनजींकडे पाहू लागले. मोहनजींनी आपलं नाव, आपण एक अभिनेते असून चित्रीकरणासाठी बंगलोरला आल्याचं सांगितलं आणि म्हणाले, “1953 च्या जुलै महिन्यात 12 तारखेला तुमच्या हॉस्पिटलात माझा जन्म झाला आहे. ज्या सर्जनशील हातांनी मला या जगाचं दर्शन घडवलं त्या डॉक्टरांची भेट घ्यावी या इच्छेने आपणास भेटायला आलो आहे.’’
डॉ. पार्थसारथींना आनंद झाला. ते इंग्रजीतून म्हणाले, “मी अनेक बाळांना या हातांनी जन्म दिलाय, पण ते बाळ क्वचितच मला मोठं झाल्यावर भेटायला आलं आहे. अर्थात ते नैसर्गिक आहे. माझ्याही तशा अपेक्षा नसतात, पण तू महाराष्ट्रातून मला भेटायला आवर्जून आलास. अभिनेता आहेस, छान वाटलं. गुड! व्हेरी गुड !! गॉड ब्लेस यू ! आय ऍम हॅप्पी, सर्टनली व्हेरी हॅप्पी.’’
तुमचा माझा, तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाचा जन्म एखाद्या हॉस्पिटलमध्ये झालेला असतो. काहीही नावच नसलेल्या बाळाला डॉक्टर जगात आणत असतात. फार कमी वेळा ते बाळ त्या डॉक्टरला पुन्हा भेटत असतं. त्यामुळे अशी भेट कायमची लक्षात राहते.