सृजन संवाद – तारा मंदोदरी तथा

>> डॉ. समिरा गुजर जोशी

अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा। 

पंचकन्या – स्मरे न्नित्यं महापातक नाशनम्? 

रोज ज्यांचे स्मरण करणे पापांचा नाश करणारे आहे अशा पंचकन्यांमध्ये `तारा’ हिचा उल्लेख येतो. ही तारा म्हणजे वालीची बायको. तिच्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते, पण मूळ वाल्मिकी रामायण वाचल्यानंतर लक्षात येते की, तिचा त्याग किती मोठा आहे, त्याचबरोबर तिचे चातुर्यही लक्षात येते. राजकारणाचे तिला उत्तम भान आहे तसेच तिचा सारासार विचार जागृत आहे हे किष्किंधाकांडातील एका प्रसंगावरून सहज लक्षात येते.

रामाने सुग्रीवाला सहाय्य करण्याचे वचन दिल्यानंतर त्याची ताकद शतपटीने वाढलेली असते,  त्यामुळे वालीने नुकताच पराभव केलेला असा सुग्रीव पुन्हा नव्या उत्साहाने वालीच्या विरुद्ध उभा ठाकतो. युद्धासाठी त्याला पुन्हा आव्हान देतो. सिंहाची गर्जना ऐकू यावी त्याप्रमाणे सुग्रीवाचे वालीला पुन्हा युद्धासाठी बोलावणे असते.  त्याची गर्जना ऐकून आपल्या शयनमहालात स्त्रियांसमवेत मद्यपान करण्यात गुंग असलेल्या वालीची सगळी धुंदी एका क्षणात उतरते. राहूने ग्रासलेल्या सूर्याप्रमाणे तो निष्प्रभ दिसू लागतो. भावाची ही गर्जना ऐकून तो प्रचंड चिडतो. त्याच्या डोळ्यातून जणू अंगार बरसू लागतो. जमिनीवर आपले पाऊल जोरात आपटत तो उभा राहतो. अशा वेळेस तारा, त्याची पत्नी भयभीत होऊन त्याला अत्यंत प्रेमाने अडवत म्हणते,  “हे वीरा, नदीच्या प्रवाहात अचानक भोवरा तयार व्हावा तसा हा राग, जो तुझ्या मनात उमटला आहे, तो सोडून दे! रात्री परिधान केलेली पुष्पमाला ज्याप्रमाणे दुसऱया दिवशी उपयोगी नसते तसाच हा रागही तुझ्या उपयोगाचा नाही! मला असं वाटतं की, या क्षणी तू त्याच्याशी लढायला जाणे योग्य नाही. तुझा शत्रू तुझ्यापेक्षा बलाने अधिक निश्चित नाही किंवा तू कोणत्याही बाबतीत त्याच्यापेक्षा कणभरसुद्धा कमी नाहीस. याआधी जेव्हा सुग्रीवाने तुझ्याविरुद्ध युद्ध केले तेव्हा तू त्याच्याशी लढलास आणि त्याला हरवून पिटाळूनसुद्धा लावलेस. पण हे लक्षात घे की,  नुकताच तुझ्याकडून पराभूत झालेला हा सुग्रीव पुन्हा एकदा तुला युद्धासाठी बोलावीत आहे. यामुळे माझ्या मनात शंका उत्पन्न झाली आहे, कारण तुला असे आवाहन करत असताना त्याच्यामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे! कोणाचे तरी सहाय्य मिळाल्याशिवाय तो अशा पद्धतीने गर्जना करू शकणार नाही हे निश्चित!  सुग्रीव स्वभावत चतुर आणि बुद्धिमान आहे. त्याने आपला विजय निश्चित करण्यासाठी जरूर कोणाशी तरी मैत्री केली आहे आणि या नव्याने मिळालेल्या आधाराच्या जोरावरच तो तुला इतक्या विश्वासाने युद्धासाठी बोलवतो आहे. आपला मुलगा अंगद सावधपणे जंगलात फिरत असतो. वानर राज्याची नेमकी अवस्था जाणून घेत असतो. त्याने आणलेल्या माहितीप्रमाणे या वनामध्ये दोन वीर दाखल झाले आहेत. माझी खात्री आहे की ते वीरच सुग्रीवाचे सहाय्यक बनले असले पाहिजेत.

राम  आणि लक्ष्मण कोण आहेत आणि ते वनात कशासाठी आले आहेत हेही तिला चांगलेच माहीत आहे… ती थेटपणे वालीला सांगते की, “त्यांच्याशी भांडण करू नकोस.  सुग्रीव तुझा छोटा भाऊ आहे, त्याला तू युवराज म्हणून राज्याभिषेक कर आणि श्रीरामचंद्रांशी मैत्री संपादन कर… गोड बोलून तू सुग्रीवाचे मन वळव व त्याला दान, मान – जे हवे ते दे. म्हणजे तो आपोआपच वैर विसरून तुझ्याबरोबर आनंदाने राहू लागेल. दोन भावांमध्ये वैर असणे चांगले नाही! जर तुला माझे मन राखायचे असेल आणि मी तुझ्या हिताचा विचार करते यावर तुझा थोडा जरी विश्वास असेल, तर माझ्या या बोलण्यावर न रागावता तू ताबडतोब त्याची अंमलबजावणी करशील!”

अर्थात वाली स्वतच्या विजयाने इतका उन्मत्त झालेला होता की त्याने तारेच्या या समजावण्याकडे लक्ष दिले नाही आणि सुग्रीवाचे आव्हान स्वीकारले. तारेचा अंदाज अचूक होता. सुग्रीवाबरोबर झालेल्या युद्धात रामाच्या बाणाने वाली मारला गेला. त्याच्या शेवटच्या श्वासांचे वर्णन वाल्मिकींनी फार सुंदर केले आहे. तिथेही विलाप करणारी तारा भेटते. ती पुन्हा सुग्रीवाला आठवण करून देते की, मी तुला याचसाठी हे युद्ध स्वीकारू नको असे म्हटले होते. या सगळ्या प्रसंगात आणखी एक व्यक्तिरेखा आहे जी तारेप्रमाणेच दुर्लक्षित राहिलेली आहे; तो म्हणजे सुग्रीव आणि तारा यांचा सुपुत्र अंगद. त्याच्याविषयी पुन्हा कधीतरी बोलूया. पण पंचकन्यांमध्ये जिचा समावेश झाला आहे अशा तारेची ही चातुर्यकथा तुम्हाला सांगावीशी वाटली. तिच्या आयुष्यातील आणखी एक प्रसंग महत्त्वाचा आहे, त्याविषयी पुढील लेखात जाणून घेऊया.

(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)