बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बहुसंख्य शाळांमध्ये सुरक्षा उपाययोजना सक्षम नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांनंतर शाळांमध्ये अचानक भेटी देऊन सुरक्षा उपाययोजनांची तपासणी करण्यात यावी. ज्या शाळांमध्ये त्रुटी आढळतील अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी युवासेनेने केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई विद्यापीठ युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत, राजन कोलबेकर यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची भेट घेऊन बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने 21 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी केली.
सरकार शासन आदेश काढून मोकळे होते, परंतु त्याची अंमलबजावणी होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्या अनुषंगाने युवासेनेने निवेदन देऊन इशारा दिला की, युवासेनादेखील दहा दिवसांनंतर अशा प्रकारच्या शाळांमध्ये अचानक भेट देऊन सुरक्षा उपाययोजनांची पाहणी करून त्रुटी आढळल्यास दोषी शाळांवर शिवसेना पद्धतीने कारवाई करेल.