
म्हाडाने दुकानांच्या विक्रीसाठी लावलेल्या ई लिलावात विजेते होऊनदेखील 112 पैकी 53 विजेत्यांनी दुकान घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता उर्वरित 59 विजेत्यांनाच ऑफर लेटर पाठविण्याची नामुष्की म्हाडावर ओढावली आहे. विविध योजनाअंतर्गत बांधलेल्या मालाड, गोरेगाव, पवई, चारकोप येथील 173 दुकानांच्या विक्रीसाठी म्हाडाने फेब्रुवारीच्या शेवटी जाहिरात काढली होती. 173 दुकानांपैकी 61 दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला. त्यामुळे 112 दुकानांचा ई-लिलाव करण्यात आला. त्यासाठी 604 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले होते. आचारसंहितेमुळे रखडलेला दुकानांचा ई लिलाव 27 जूनला पार पडला. ई-लिलावातील विजेत्यांना ऑफर लेटर पाठविण्यास म्हाडाने आता सुरुवात केली आहे. 112 पैकी 53 विजेत्यांनी तात्पुरते देकारपत्र स्वीकारले नाही. त्यामुळे आता उर्वरित विजेत्यांनाच ऑफर लेटर पाठविण्यात येणार आहे.