मुंबईत दोन दिवस मुसळधार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तीन दिवस पावसाचे

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात तापमानात 4 ते 5 अंश सेल्सियसने वाढ झाल्याने अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. ऐन पावसाळ्यात ऑक्टोबर हीट जाणवत आहे. या उकाड्यापासून आता मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. कोकण किनारपट्टीपासून केरळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे 24 आणि 25 हे दोन दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उद्यापासून 26 ऑगस्टपर्यंत म्हणजेच तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुन्हा 28, 29 आणि 30 ऑगस्ट हे तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे वैज्ञानिक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

बळीराजासाठी आनंद सरी

पाऊस गायब झाल्याने पाण्याविना शेतीची दुरावस्था झाली असून ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तरी वरुणराजा कृपा करेल असा अंदाज आहे. त्यामुळे बळीराजासाठी या आनंद सरी ठरतील. नाशिक आणि नंदुरबार जिह्यातही पावसाचा अंदाज असून विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई तसेच पालघर जिह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे तसेच विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. सोमवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि अमरावती जिह्यातही पावासाचा अंदाज आहे.