
आज टी-20 क्रिकेटमध्ये सुपर से उपर असा थरार पाहायला मिळाला. महाराजा टी-20 ट्रॉफीच्या निमित्ताने हुबळी टायगर्स आणि बंगळुरू ब्लास्टर्स यांच्यात झालेला सामना चक्क तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये निकालात निघाला आणि क्रिकेटप्रेमींना एक आगळावेगळा थरार अनुभवायला मिळाला. या थरारक सामन्यात हुबळी टायगर्सला मनवंथ कुमारने दोन चौकार ठोकून विजय मिळवून दिला.
टी-20 क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच तीन-तीन सुपर ओव्हर खेळविल्या गेल्या. हुबळी टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना 164 धावा केल्या होत्या, तर बंगळुरू ब्लास्टर्स या धावसंख्येचा पाठलाग करताना त्यांनी बरोबरी साधली होती आणि त्यांना शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज होती आणि क्रांती कुमार धावचीत झाला आणि सामना बरोबरीत सुटला.
बंगळुरू ब्लास्टर्सने 14 षटकांत जेमतेम शंभरी गाठल्यामुळे त्यांना 6 षटकांत 65 धावांची गरज होती. तेव्हा सूरज अहुजा, अनिरुद्ध जोशी आणि ग्नेश्वर नवीन यांनी फटकेबाजी करून 5 षटकांत 59 धावा चोपून काढल्या. शेवटच्या षटकात सहा धावांची गरज होती आणि नवीनने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचत ब्लास्टर्सचा विजय जवळजवळ निश्चित केला, पण पुढच्याच चेंडूवर नवीन बाद झाला. त्यानंतर आलेल्या लवीश कौशलला एलआर कुमारने अक्षरशः दोन चेंडू खेळवत सामनाच फिरवला. मग तिसऱ्या चेंडूंवर एक बाइज धाव काढली. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर विजयी धावेची गरज होती. पण फलंदाजीला असलेला क्रांती कुमार एक धाव काढण्यात अपयशी ठरला. तो धावचीत झाला आणि बंगळुरू ब्लास्टर्सने हातातोंडाशी आलेला सामना गमावला. मनवंत कुमारने 33 धावांत 4 विकेट घेत सामना फिरवला.
सुपर ओव्हर संपता संपेना
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बंगळुरू ब्लास्टर्सने 10 धावा केल्या तर कर्णधार मनीष पांडेने चौथ्या चेंडूवर षटकार खेचत संघाला 9 वर पोहोचवले. त्यामुळे 2 चेंडूंत दोन धावा हव्या होत्या. पण मनीषला केवळ एकच धाव काढता आली आणि सामना टाय झाला. मग दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये हुबळी टायगर्सला केवळ 8 धावाच करता आल्या. 9 धावांचा पाठलाग करताना चेतनने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला, पण पुढील पाच चेंडूवर त्यांना एक-एकच धाव काढता आली आणि हा सामनाही बरोबरीत सुटला. मग तिसरा सुपर ओव्हर रंगला, ज्यात बंगळुरू ब्लास्टर्सने 12 धावा ठोकल्या, तर हुबळी टायगर्सच्या मनवंत कुमारने दोन चौकार ठोकून विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूवर हुबळीला 3 धावांची गरज होती तेव्हा मनवंतने चौकार खेचला आणि टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील अनोखा विजय साकारला.