वॉर्न माझ्या कुटुंबातलाच होता…, आठवण येताच कुलदीप झाला भावुक

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीवीर शेन वॉर्न हा माझ्यासाठी नेहमीच एक आदर्श व्यक्तिमत्त्व होता. त्याच्यासोबत माझं एक खास नातं होतं. जेव्हा जेव्हा त्याच्याबद्दल मनामध्ये विचार येतो तेव्हा मन भावुक होतं. जणू मी माझ्या कुटुंबातील एक सदस्य गमावलाय ही भावना आजही माझ्या मनात कायम घर करून आहे, अशी भावना हिंदुस्थानचा फिरकीवीर कुलदीप यादवने व्यक्त केली.

सध्या कुलदीप यादव आपल्या कुटुंबीयासोबत ऑस्ट्रेलियाच्या सहलीसाठी दाखल झाला आहे. त्यावेळी त्याने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला भेट दिली. यावेळी मैदानाबाहेर असलेल्या शेन वॉर्नच्या पुतळ्यासमोर उभे राहून कुलदीपने काही फोटो काढले असून, ते फोटो सोशल मीडियावर शेअर करत वॉर्नच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

कुलदीप म्हणाला, शेन वॉर्नच्या निधनाचे वृत्त समजले तेव्हा मोठा धक्का बसला. आपल्या कुटुंबातील एक सदस्य गमावल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली. आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धा 22 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी कुलदीप यादवनं ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या मुख्यालयाला भेट दिली. तसेच, सीईओ निक हॉकले यांच्याशी ऑनलाइन चर्चा केली.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी उत्सुक

मी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहे. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. ऑस्ट्रेलियात आल्यावर हिंदुस्थानी चाहत्यांचे जे प्रोत्साहन मिळते, तेच चित्र बॉर्डर-गावसकर स्पर्धेतही पाहायला मिळेल, असेही कुलदीप म्हणाला.