…अन् ती पोस्ट फेक ठरली, राहुलच्या निवृत्तीच्या पोस्टने माजली खळबळ

सोशल मीडियावर कधी काय पोस्ट होईल काही सांगता येत नाही. आज सकाळी क्रिकेटपटू केएल राहुलच्या निवृत्तीची पोस्ट एक्सवर पडताच वाऱ्यासाखी व्हायरल झाली आणि हिंदुस्थानी क्रिकेटविश्वात अक्षरशः खळबळ माजली. टी-20 वर्ल्ड कपच्या हिंदुस्थानी संघात स्थान न मिळाल्यामुळे राहुल निराश होताच. त्यातच नुकत्याच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याच्या बॅटीतून धावाच निघाल्या नव्हत्या. त्यामुळे त्याच्या या पोस्टवर अनेकांनी विश्वासही ठेवला; पण काही वेळातच ही पोस्ट फेक असल्याचे समोर आले आणि क्रिकेटप्रेमींनी सुटकेचा निश्वास सोडला.

राहुलने आज सकाळी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यात म्हटले होते की, मला एक घोषणा करायची आहे. तुम्ही थोडी प्रतीक्षा करा. काही मिनिटांनीच या पोस्टच्या अनेक स्क्रीनशॉट्स राहुलच्या प्रोफाईल फोटोसह व्हायरल झाल्या. ज्यात राहुल आपल्या निवृत्तीची घोषणा करत असल्याचे म्हटले होते. ही पोस्ट व्हायरल होताच काहींनी त्याच्यावर विश्वास ठेवत त्याच्या क्रिकेट कारकीर्दीला सॅल्यूट केला, तर काहींनी दुःखही व्यक्त केले. मात्र काही चाहत्यांनी हा सारा प्रकार फेक असल्याचा संशय व्यक्त केला गेला. एवढेच नव्हे तर, काही चाहत्यांनी दावा केला की ही पोस्ट राहुलनेच केली होती आणि ती थोड्या वेळाने त्यानेच डीलिट केली. मात्र काही चाहत्यांनी या पोस्टला फोटोशॉपची करामत म्हटले होते.

काही सोशल मीडियावर खळबळ माजवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या डोकेबाजांची ती कला होती. त्यामुळे सकाळी सकाळी क्रिकेटविश्व हादरले. पण राहुलच्या एक्स अकाऊंटवर गेल्यावर असे काहीच नव्हते. त्यामुळे काही वेळाने लोकांनाही कळून चुकले की, हे सारे फेक होते. राहुल आता 32 वर्षांचा असून त्याच्यासमोर अजून सहा-आठ वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे. जरी आता तो हिंदुस्थानी संघाच्या टी-20 फॉरमॅटमध्ये नसला तरी तो वनडे आणि कसोटीत संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे, जो फार काळ संघाबाहेर राहू शकणार नाही.