हिंदुस्थानचा गोल्डनबॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा डायमंड लीग स्पर्धेचे मैदान गाजवले आहे. ‘लुसाने डायमंड लीग’ स्पर्धेमध्ये नीरजने 89.49 मीटर भालाफेक केली. मात्र, त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नीरजने 89.45 मीटर भालाफेक करत रौप्य पदकाची कमाई केली होती. 14 दिवसांच्या आतच नीरजने ऑलिम्पिकमधील स्वतःचा विक्रम डायमंड लीग स्पर्धेत मागे टाकला आहे. मात्र, अद्याप नीरजला 90 मीटरची सीमा ओलांडता आली नाही.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नीरजकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा असताना दुखापतीमुळे त्याला सुवर्ण पदक कायम राखता आले नाही. त्याला दुसऱ्या स्थानासह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. डायमंड लीग स्पर्धेमध्ये नीरजने 89.49 मीटरचा भालाफेक केली. या स्पर्धेतील नीरजची ही आतापर्यंतची सर्वात सर्वोत्तम फेक ठरली आहे. विशेष म्हणजे, हर्नियासारख्या समस्येने त्रस्त असतानाही त्याने ही कमालीची कामगिरी केली.
मात्र 89.49 मीटर भालाफेक करूनही नीरजला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्स याने 90.61 मीटर भालाफेक करत नीरजला मागे टाकले. हाच अँडरसन पीटर्स पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजच्या मागे राहिला होता. त्याने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.
डायमंड लीग स्पर्धेमध्ये नीरजनं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पहिल्या प्रयत्नात नीरजनं 82.10 मीटर अंतरावर भाला फेकला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 83.21 मीटर अंतरावर भाला फेकला. तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात त्याने अनुक्रमे 83.13 आणि 82.34 अंतरावर भाला फेकला. पाचव्या प्रयत्नात 85.58 मीटर भाला फेकला. शेवटच्या प्रयत्नात त्याने 89.49 मीटरची फेक करत आपल्या सर्वोत्तम फेकीची नोंद केली.
गोल्डन बॉय स्वप्नापासून मागेच
भालाफेकमध्ये 90 मीटरची सीमा ओलांडण्याचे नीरजचे स्वप्न आहे. नीरजला अद्याप आपल्या कारकिर्दीत 90 मीटरच्या पार भाला फेकता आलेला नाही. स्टॉकहोम डायमंड लीग स्पर्धेत त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरीची नोंद केली होती. 2022 मध्ये त्याने या स्पर्धेत 89.94 मीटर अंतरावर भाला फेकला होता.