आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, नराधमांचा शोध सुरू

गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. महिला अत्याचाराची ही मालिका अजूनही सुरूच आहे. आता ट्यूशनवरून परतत असताना मोटार सायकलवरून आलेल्या तिघांनी एका अल्पवयीन मुलीला मारहाण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना आसामच्या नागावमध्ये घडली. या घटनेनंतर बदलापूरप्रमाणे तिथेही जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी नराधमांना तत्काळ अटक करून कठोर शासन करण्याची मागणी लावून धरत ठिकठिकाणी आंदोलने झाली. दरम्यान, देशात महिला अत्याचाराच्या घटना घडत असताना मोदी मात्र, पोलंड आणि युव्रेनचा दौरा करण्यात व्यस्त असून जनतेचा सरकारवरील रोष दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र आहे.

गुरुवारी सायंकाळी संबंधित मुलगी ट्यूशनवरून घरी परतत असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. ही मुलगी त्या भागातील नागरिकांना अर्धवट बेशुद्ध अवस्थेत सापडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर स्थानिक नागरिक प्रचंड संतप्त झाले. विविध संघटना आणि नागरिकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत बंद पुकारला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका 14 -वर्षीय मुलीवर आसामच्या नागावमध्ये सामूहिक बलात्कार झाला.

पोलीस काय म्हणाले?

पीडितेवर तिघांनी बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मुलीचा जबाब महिला पोलीस अधिकाऱ्याने नोंदवून घेतला आहे. तसेच जे शास्त्रीय पुरावे आहेत ते गोळा करण्यात आले असून पीडितेने केलेल्या वर्णनानुसार ते आरोपी कोण होते? त्यांचा आम्ही शोध घेत आहोत, अशी माहिती पोलीस अधीक्षक स्वप्नील डेका यांनी पत्रकारांना दिली.

जनतेचा उद्रेक

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाल्यानंतर जनक्षोभ उसळला. मुलीला न्याय मिळाला पाहिजे, नराधमांना तत्काळ अटक करा अशी मागणी करत विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. दुकाने बंद ठेवण्यात आली. त्यानंतर आसामचे पोलीस महासंचालक घटनास्थळी दाखल झाले आणि या प्रकरणातील नराधमांना पकडून कठोरातील कठोर शासन दिले जाईल, असे आश्वासन दिले.

चार वर्षांत देशात बलात्काराच्या घटनांत 96 टक्के वाढ- काँग्रेस

एनसीआरबी अर्थात नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार देशात रोज 86 बलात्कार होतात. अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषण अशा घटनांमध्ये 2019 ते 2023 दरम्यान म्हणजेच गेल्या चार वर्षांत तब्बल 96 टक्क्यांची वाढ झाल्याचे काँग्रेसने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. 2021 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार एकट्या महाराष्ट्रात रोज 21 बलात्काराच्या घटना घडत असल्याचे उघड झाले होते. महाराष्ट्रात लेकींना, महिलांना अशा असुरक्षित वातावरणात जगण्याची वेळ आली आहे. या महिला ना घरत सुरक्षित आहेत ना घराबाहेर, अशा शब्दांत काँग्रेसने एनडीए सरकारवर निशाणा साधला आहे.

चंदिगडमध्ये विद्यार्थिनीवर शाळा बस चालकाचा बलात्कार

चंदिगडमध्ये 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेच्या बस चालकानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोहम्मद रज्जाक असे या आरोपीचे नाव असून त्याला चंदिगड पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून मोहम्मद रज्जाक मॉर्फ केलेला फोटो दाखवून पीडितेला ब्लॅकमेल करत होता. त्याने तीनवेळा तिच्या घरी जाऊनही तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या तरुणीने पालकांना या संपूर्ण प्रकाराची माहिती दिल्यानंतर पालकांनी पोलिसांत तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. तसेच त्याच्याविरोधात बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.