परीक्षण – तत्त्वबोधाचे सुरम्य चिंतन

>>डॉ. अस्मिता देशमुख

पुरोगामी महाराष्ट्राने समतेच्या पायावर अध्यात्माची इमारत उभी करून ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर संतांनी विठ्ठलभक्तीचा वारसा अखंड जपला आहे. अशाच एका पुण्यवान घराण्यात संत श्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला. श्री गोंदवलेकर महाराजांच्या सर्वांगीण चरित्राचा वेध घेणारे व्यक्तिमत्त्वाचा उलगडा करणारे प्रा. शरयू जाखडी लिखित ‘श्री ब्रह्मचैतन्य महाराज-गोंदवले’ हे पुस्तक. लेखिकेने या पुस्तकात महाराजांच्या घराण्याचा पूर्वेतिहास सांगताना त्या घराण्यातील हरिहर ऐक्याचा उल्लेख केला आहे. महाराजांच्या पूर्वजांची नावे रुद्रोपंत, लिंगोपंत अशी शिवस्वरूप असली तरी ते सर्व एकादशी व्रत करीत, तसेच वैष्णवांना प्रिय असलेली पंढरपूरची वारी करीत. या पुस्तकात महाराजांच्या घराण्यातील स्त्री-पुरुषांची विशेषतः रेखाटताना त्यांची सुसंस्कृत संस्कारक्षम मने, मानवतावादी दृष्टी, अन्नदान आणि परोपकारासाठी सदैव उत्सुक असे त्यांचे अभ्यासपूर्ण वर्णन लेखिकेने केले आहे.

महाराजांच्या बालसुलक्ष खोडय़ा उलगडताना महाराजांना हनुमंताचा अवतार समजतात असे अर्थपूर्ण स्पष्टीकरण लेखिकेने दिले आहे. महाराजांची आई, महाराजांचे आजोबा, बालसोबती सवंगडी हा कथाभाग लालित्यपूर्ण ओघवत्या भाषेमुळे वाचनीय आणि मननीय झाला आहे. महाराज 12 वर्षांचे असताना त्यांनी गुरू शोधार्थ आपले घर आणि गाव सोडले. हिंदुस्थानभर भ्रमण करून त्यांनी अनेक संतमहात्म्यांच्या भेटी घेतल्या. त्यांचे आशीर्वाद संपादन केले व त्यांच्याकडून वेदविद्या शिकून घेतल्या. याचे यथार्थ वर्णन पुस्तकात आढळते. सर्व योग्यांनी महाराजांना आशीर्वाद दिले, पण त्यांचे गुरुपद स्वीकारले नाही. अध्यात्मात साधकाचा गुरू अगोदरच ठरलेला असतो. अखेरीस त्यांचे गुरू मराठवाडय़ातील तुकाराम चैतन्य असल्याचे एका रामदासीने सांगितले. त्यानुसार सद्गुरू तुकाराम चैतन्य ऊर्फ तुकामाई यांचा शोध घेत महाराज मराठवाडय़ातील येहळे गावी आले. तेथे त्यांची तुकामाईंशी गाठ पडली. गुरूने घेतलेल्या कठोरातल्या कठोर परीक्षा महाराजांनी दृढ श्रद्धेने आणि निरंतर सेवेने उत्तीर्ण केल्या. महाराजांची निरिच्छता ओळखून तुकामाई प्रसन्न झाले आणि एका रामनवमीच्या दिवशी रानात एकांतस्थळी अशोकवृक्षाखाली महाराजांना योगदीक्षा, अनुग्रह व ब्रह्मचैतन्य हे नाव दिले. गुरूकडून दीक्षा मिळता क्षणीच जगदाभास मावळून महाराजांना परतत्त्व स्पर्श होऊन ब्रह्मानुभूती झाली आणि ब्रह्मानंदात ते लीन झाले. या सुंदर अनुभूतीचे रेखाटन लेखिकेने प्रत्ययकारी केले आहे.

महाराज आणि त्यांची अर्धांगिनी सरस्वती यांच्या नात्याचा अनुबंध विणताना लेखिकेने त्या नात्यातील अलौकिकता पाहून त्यांच्या नात्याला शिव-पार्वतीच्या चिरंतन नात्याचे परिमाण देऊन उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे. ‘गोंदवल्याचा राम’ या प्रकरणात महाराज आणि रामाच्या सरव्यभक्तीचे अपूर्व वर्णन आहे. रामाच्या मूर्तीतील विश्वचैतन्य सचेतन होऊन त्याने महाराजांच्या विरहाने अश्रू ढाळले आहेत. हा चमत्कार केवळ गोंदवल्याच्या रामाने घडवला आहे. हे संपूर्ण प्रकरण हृदयस्पर्शी झाले आहे.

रामनाम, अन्नदान आणि कोणाचे मन कधी न दुखवणे या त्रिसूत्रीवर महाराजांच्या उपदेशाचे सार आधारित आहे. महाराजांनी लाखो लोकांना रामनामाच्या नामस्मरणाला लावून त्यांना आश्वासित केले. ‘जेथे नाम तेथे माझे प्राण। ही सांभाळावी खूण ।।’ या त्यांच्या अखेरच्या संदेशाने महाराजांच्या चरित्राचा निरोप वाचनीय आहे. हा या पुस्तकाचा गाभा म्हणायला हरकत नाही.

 श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले

n लेखिका प्रा. शरयू जाखडी

n प्रकाशक विजया प्रकाशन

n पृष्ठे 188 n मूल्य रु. 200