जगभरातील घडामोडी…

मंदिरात घंटा वाजवल्याने ध्वनि प्रदूषण

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा सोसायटीतील मंदिरात सकाळ-संध्याकाळ पूजा करण्यात येते. या वेळी घंटा जोरात वाजवली जाते, अशी तक्रार काही रहिवाशांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. तक्रार मिळताच अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. परंतु या वेळी मंदिरातील घंटेचा आवाज 72 डेसिबल होता. हा आवाज 55 डेसिबलच्या आत ठेवावा, असे सांगत अधिकाऱयांनी सोसायटीला एक नोटीस बजावली. परंतु रहिवाशांनी याला तीव्र विरोध दर्शवला. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेली नोटीस अखेर मागे घेतली. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार असून भाजपच्या राज्यात आता मंदिरातील घंटा वाजवण्यावरही बंदी येणार का, असा सवाल सोशल मीडियावरून विचारला जात आहे.

झोमॅटोची इंटरसिटी सेवा अखेर बंद

ऑनलाईन फूड डिलिव्हरी झोमॅटोने आपली इंटरसिटी सेवा लिजेंड्स बंद केली आहे. कंपनीचे मालक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी ही माहिती दिली. इंटरसिटी लिजेंड्स सेवेला 2022मध्ये लाँच करण्यात आले होते. या सेवेतून कंपनीला कोणताही फायदा होत नव्हता.

इटलीत बुडालेल्या तिघांचे मृतदेह सापडले

इटलीतील सिसिली बेटाजवळ बायेशियन नावाची लक्झरी नौका तीन दिवसांपूर्वी बुडाली होती. या दुर्घटनेतील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. यात ब्रिटनचे उद्योगपती माईक लिंच आणि त्यांची 18 वर्षांची मुलगी हन्ना यांचा समावेश आहे.

चार तासांत बुडाले 2126 कोटी रुपये

उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर सेबीने कारवाईचा बडगा उगारताच अनिल अंबानींच्या कंपन्यांना जोरदार झटका बसला आहे. कंपनींच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने अवघ्या 4 तासांत 2 हजार 126 कोटी रुपये बुडाले आहेत.

हिंदुस्थानींकडे 25 हजार टन सोने

हिंदुस्थानी लोकांकडे जवळपास 25 हजार टन सोने आहे. याची किंमत बाजारभावानुसार, 126 कोटी रुपये आहे, अशी माहिती पीडब्ल्यूसी इंडियाच्या एका अहवालातून समोर आली आहे. पुढील दोन वर्षांत सोन्याच्या बदल्यात कर्ज मिळण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यताही या अहवालातून वर्तवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सोन्याच्या बदल्यात कर्ज यात वाढ झाली होती. तसेच 7.1 कोटी रुपयांच्या मूल्यांवर बाजार पोहोचला होता, असेही या अहवालात म्हटले आहे.

फास्टॅग रिचार्ज आणखी सोपे

प्रवासात फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज पडते. प्रवासाला निघण्यापूर्वी फास्टॅग बॅलन्स तपासावा लागतो. जर टोलनाक्यावर पोहोचल्यावर तुमच्या फास्टॅगमध्ये पैसे नसतील तर तुम्हाला दुप्पट टोल द्यावा लागतो किंवा फास्टॅग रिचार्ज होण्याची वाट पाहावी लागते. एवढी सगळी खटपट करावी लागते. मात्र आता यापासून सुटका होणार आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फास्टॅगमध्ये बँक अकाऊंटमधून थेट पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा फायदा नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डवाले (एनसीएमसी) घेऊ शकतात.

‘स्त्री-2’चा 300 कोटींचा गल्ला

बॉलीवडू अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘स्त्राr-2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 15 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 294.35 कोटी रुपये कमावले असून हा चित्रपट अवघ्या 9 दिवसांत 300 कोटींच्या नजीक पोहोचला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ओपनिंगला 51.8 कोटी रुपये कमावले होते.

राम मंदिराला 363 कोटींच्या देणग्या

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराला आतापर्यंत 363 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024पर्यंतच्या या देणग्या आहेत. ट्रस्टला 2600 कोटी रुपयांवर 204 कोटी रुपये व्याज म्हणून मिळाले आहेत. मंदिराच्या भूमिपूजनानंतर मंदिराला 13 क्विंटल चांदी आणि 20 किलो सोने मिळाले आहे.

आजपासून तीन दिवस बँका बंद

उद्या, शनिवारपासून तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. 24 ऑगस्टला दुसरा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी असणार आहे. 25 ऑगस्टला रविवार आणि 26 ऑगस्टला जन्माष्टमी असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. महिन्याच्या सुरुवातीला भारतीय रिझर्व्ह बँकेने सुट्टय़ांची यादी प्रसिद्ध केली होती. यात सोमवारी जन्माष्टमी असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे.

चीनच्या आकाशात दिसले सात सूर्य

चीनमधील एक चमत्कारिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक नव्हे तर तब्बल सात सूर्य दिसत आहेत. चेंग्दू येथील एका रुग्णालयातील महिलेने हा व्हिडीओ टिपल्याचे समजतंय. व्हिडीओ बघून सारेच चक्रावून जात आहे. खरं तर सात सूर्याचा हा व्हिडीओ म्हणजे कोणताही चमत्कार नसून ते एक ऑप्टिकल इल्युजन आहे.

पाकिस्तानी एअरलाइन्स सर्वात अस्वच्छ

जगात सर्वात अस्वच्छ एअरलाइन्स कोणती असेल तर ती पाकिस्तानची आहे, असा दावा एका पाकिस्तानी यू-टय़ुबर्सने केला आहे. या तरुणाने एक व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर अपलोड केला. पाकिस्तानी एअरलाईनमधील प्रवास हा जगातील सर्वात धोकादायक होता, असेही त्याने या व्हिडीओत म्हटले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.