मानवी मेंदूत चिप बसवण्याचा दुसरा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांचे स्टार्टअप ‘न्यूरालिंक’ने गुरुवारी केला. ज्या रुग्णाच्या मेंदूत चीप बसवली आहे. त्या रुग्णाची प्रकृती चांगली असून त्याला कोणताही त्रास होत नसल्याचे सांगितले. काही महिन्यांपूर्वी ‘न्यूरालिंक’ने नोलँड अरबॉग नावाच्या रुग्णाच्या मेंदूत चिप बसवली होती. त्यामध्ये थ्रेट रिट्रक्शनची गडबड दिसून आली होती. परिणामी मेंदूतील सिग्नल मोजणाऱया इलेक्ट्रोडची संख्या कमी झाली होती. मात्र आता पहिला रुग्ण बरा असून तो व्हिडीओ गेम्स खेळतो, इंटरनेटचा चांगला वापर करतो, असे ‘न्यूरालिंक’ने कंपनीने सांगितले. पहिल्या रुग्णानंतर दुसऱया रुग्णात ब्रेन चिप बसवण्याचा प्रयोग करण्यात आला. दुसऱया रुग्णाचे नाव ऍलेक्स आहे. ब्रेन चिप बसवल्यानंतर ऍलेक्सची व्हिडीओ गेम्स खेळण्याची क्षमता सुधारली आहे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या मदतीने त्याने 3 डी वस्तूंचे डिझाईन सुरू केले आहे. सगळे असेच ठीक राहिले, तर येत्या काही वर्षांत शेकडो रुग्णांना दिलासा मिळू शकतो, असा दावा ‘न्यूरालिंक’ कंपनीने केला आहे.
– मेंदूत चिप बसवल्यानंतर लकवाग्रस्त रुग्ण आणि पाठीच्या कण्याला दुखापत झालेले रुग्ण सामान्यपणे काम करू शकतील.
– सर्जरी करून रुग्णाच्या मेंदूत नाण्याच्या आकाराची चिप प्रत्यारोपित केली जाते. त्याचे सूक्ष्म तार ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस विकसित करतात. मेंदूतील हालचाली ब्ल्यूटूथच्या माध्यमातून स्मार्टफोनवर पाठवण्याचे काम ब्रेन चिप करते.
– आगामी काळात शेकडो लोक ‘न्यूरालिंक’ ब्रेन चीपचा वापर करताना दिसतील, असे मस्क म्हणाले.