माहित नसेल तर गप्प बसा… कुस्तीपटू इमान खलिफला पाठिंबा दिल्याने तापसी पन्नू झाली ट्रोल!

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू नेहमीच आपली मते बिनधास्तपणे मांडत असते. अनेकदा वादग्रस्त विषयांवर देखील उघड मतं मांडताना दिसली आहे. मग ते राजकीय विषय असो किंवा सामाजिक तिची मतं मांडण्यास ती घाबरत नाही. आता पुन्हा एकदा तापसीने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये झालेल्या एका वादावर स्वत: चे मत मांडले आहे, ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

अल्जेरियन बॉक्सर इमान खलीफच्या लैंगिक पात्रतेच्या वादा वर तापसीने सुद्धा मत मांडले आहे. यावरून तापसीला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. तापसीचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकाने आपल्याला ज्याविषयी फार माहिती नाही त्याबद्दल आपण काही बोलू नये असे म्हटले आहे.

गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (IBA) महिला चॅम्पियनशिपमध्ये पात्रता निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्यामुळे खलीफला अपात्र ठरविण्यात आले होते. ESPN ने दिलेल्या अहवालानुसार तिच्या टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे तिला स्पर्धेतून बाद करण्यात आले होते. तापसीने या मुद्द्याबद्दल आणि क्रीडा क्षेत्रातील लिंग चाचणी या विषयाशी कसा व्यवहार चालतो याबद्दल तिचे मत मांडले.

तापसीने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या विषयाशी निगडीत एक चित्रपट केला आहे. ज्याचे नाव रश्मी रॉकेट असे आहे. हा चित्रपट एका महिला खेळाडूवर आहे. या खेळाडूला तिची टेस्टोस्टेरॉन पातळी वाढल्याने बॅन करण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘रश्मी रॉकेट’मधील तिच्या पात्राबद्दल व इमान खलीफसोबत झालेल्या गोष्टीला उद्देशून तिने सांगितले की, माझे हार्मोन्स माझ्या नियंत्रणात नाहीत, याचा अर्थ असा नाही की मी सप्लिमेंट किंवा इंजेक्शन घेते, मी अशीच जन्माला आले आहे.

यानंतर तापसीने ऑलिम्पिकमध्ये अनेक पद जिंकणारे उसैन बोल्ट आणि मायकल फेल्प्स यांचे नाव घेत सांगितले की, इतर खेळाडूंपेक्षा त्यांना त्यांच्या उपजत असलेल्या शरीर रचनेचा फायदा झाला. बाकी खेळांडूच्या तुलनेत त्यांच्या शरीर संरचनेमुळे फायदा झाला आहे. तापसीच्या मते हे सर्व लोक इतरांपेक्षा जैविक फायदा घेऊन जन्माला आले आहेत, मग या सर्वांवर बंदी का नाही घालण्यात आली? फक्त ज्यांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त आहे त्यानाचं का? जर इमानने या स्पर्धेसाठी इंजेक्शन किंवा हार्मोन्स घेतले असतील तर ते बेकायदेशीर आहे आणि यासाठी तिच्यावर बंदी घालावी. पण तसं नाही, त्यामुळे ज्यावर तिचं नियंत्रण नाही त्यावरून तिला बंदी घालणे हे योग्य नाही, तिच्या या वक्तव्यामुळे तापसीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

अनेक वापरकर्त्यांनी उसेन बोल्ट आणि मायकल फेलप्सची तुलना इमान खलीफसोबत केल्याने तापसीला ट्रोल करायला सुरुवात केली. एका वापरकर्त्याने, म्हणजे तापसी आता डॉक्टर झाली आहे असे म्हटले आहे.