पुण्यात हिट अॅण्ड रन प्रकरण दडपण्यासाठी जे कारनामे करण्यात आले त्याचीच पुनरावृत्ती नवी मुंबईत पुन्हा घडली आहे. पनवेलकडून ठाण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक घणसोली रेल्वे स्थानकासमोर एका दुचाकीवर आदळला. या अपघातात दुचाकीस्वार सूरज शिंदे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रक चालवणाऱ्या चालकाकडे वाहन परवाना नव्हता. त्यामुळे ट्रकमालकाने अपघात करणाऱ्या चालकाला लपवून ठेवून त्या जागी दुसराच चालक दाखवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप सूरजच्या नातेवाईकांनी केला आहे.
सूरज शिंदे हा कामावरून सुटल्यानंतर तो पहाटे पाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या घरी येत होता. तो घणसोली रेल्वे स्थानक परिसरात आला असता त्याला भरधाव ट्रकची जोरदार ठोकर बसली. यात त्याचा मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा ट्रक शिकाऊ चालक चालवत होता.
गाडी ओव्हरलोड
साखरेच्या गोणी भरलेला हा ट्रक शिकाऊ चालक चालवत होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे सूरजचा विनाकारण बळी गेला. ही गाडी ओव्हरलोड होती. त्यामुळे ट्रकमालकाने गुन्हा दडपण्यासाठी ड्रायव्हर बदली केला आहे, असा आरोप सूरजचे नातेवाईक प्रिया शिंदे, वत्सला कांबळे, चंदा धुमाळ, चेतन सूर्यवंशी, प्रकाश दबे, मुकेश दबे यांनी केला आहे. सूरजला एक वर्षाची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. सूरजच्या अपघाती निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.