शहापुरातील कोठारे घाट उतरताना एसटीचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. एसटीचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस संरक्षक कठड्याला जाऊन आदळली. या अपघातादरम्यान बसमधून 45 प्रवासी प्रवास करत होते. केवळ बसचालकाच्या सतर्कतेमुळे ही बस 200 फूट खोल दरीत कोसळण्यापासून वाचली आणि प्रवासी बालबाल बचावले.
राज्य परिवहन महामंडळाची शहापूर आगारातील एमएच 20 बीएल 1469 ही बस कोठारे येथून शहापूरच्या दिशेने निघाली. मात्र घाट उतरताना अचानक बसचे ब्रेक फेल झाले. ब्रेक लागत नसल्याने प्रसंगावधान राखत एसटीचालकाने बस उजव्या दिशेने वळवली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्याला जोरदार धडक दिली. या घटनेत बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
भंगार बसमधून वाहतूक
शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वाहतुकीसाठी कालबाह्य आणि नादुरुस्त एसटीचा वाहतुकीसाठी वापर केला जातो. या निकामी झाल्यामुळे त्या रस्त्यात बंद पडतात, तर काही ठिकाणी ब्रेक फेल होऊन अपघात होतात. त्यामुळे या एसटीने प्रवास करताना ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. एसटी व्यवस्थापनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.