राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून केवळ अधिकृत घोषणेची सारे वाट पाहात आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आखणी सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे त्यादृष्टीने दौरे आणि चर्चासत्र सुरू आहेत.
या दरम्यान युती-आघाड्यांमध्ये कायम मोठा भाऊ छोटा भाऊ अशा चर्चा या होतच असतात. निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेसची ‘मोठ्या भावाची भूमिका’ करणार नाही आणि मित्रपक्षांमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकणारा पक्षही ‘मोकळे मन’ ठेवेल. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाचा प्रश्न तसेच जागा वाटप फॉर्म्युला यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करताना, महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी गुरुवारी हे स्पष्ट केलं आहे.
इटीने यासंदर्भात एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘मला हे स्पष्ट करायचे आहे की महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष आघाडीच्या धर्माला पूर्णपणे बांधील आहे. काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीत मोठ्या भावाची भूमिका असणार नाही आणि आम्ही आमच्या मित्रपक्षांसोबत निवडणुकीच्या तयारीसह, जागांबाबत काम करू’, असं चेन्निथला यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीच्या नेतृत्वाच्या मुद्द्याबद्दल आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबद्दल विचारले असता, चेन्निथला म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावर आणि आमच्या मित्रपक्षांसोबत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबद्दल खुल्या विचारांनी काम करत आहे. चर्चा सुरू आहे. आणि मी आत्मविश्वासाने सांगतो की काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रश्नांना सांघिक भावनेने हाताळत आहेत’.
चेन्निथला हे सध्या मतदारसंघनिहाय मुल्यांकन आणि जिल्हा काँग्रेस समित्यांच्या (DCC) तयारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी असंही सूचित केलं की महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत काही लहान पक्षांना सामावून घेईल.
‘महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षासाठी, सर्वोच्च प्राधान्य हे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-नियंत्रित राज्य सरकारच्या तत्त्वशून्य आणि लोकशाहीविरोधी सरकारशी लढणे आणि पराभूत करणे आहे’, असं अधोरेखित करण्यात आलं आहे.
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या एकजुटीसाठी आणि उद्देशासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहेत. लोकसभा निवडणुकीत हाच INDIA आघाडीचा आत्मा होता. महाविकास आघाडी, कामगार आणि शेतकरी पक्ष, डावे आणि समाजवादी पक्ष यांसारख्या पक्षांसोबत काम करण्यासही काँग्रेस तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं . काँग्रेसला 13 जागांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला 9 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 8 जागांवर मोठा विजय मिळाला होता.