हिंदुस्थानी कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या संरक्षणासाठी दिल्ली पोलीस पुन्हा सज्ज झाले आहेत. बृजभूषणविरोधात लैंगिक शोषणासंदर्भात साक्ष देणाऱया महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवण्यात आल्याची पोस्ट खुद्द कुस्तीपटू विनेश फोगाटने टाकल्यामुळे पुन्हा ‘दंगल’ सुरू झाली आहे, मात्र दिल्ली पोलीसांनी विनेशचे आरोप फेटाळून लावले आहेत.
गेली दोन वर्षे कुस्तीतील महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनी हिंदुस्थानी क्रीडा विश्व ढवळून निघाले आहे. सध्या लैंगिक प्रकरण न्यायालयात असून लवकरच बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध साक्ष दिली जाणार आहे. त्यापूर्वीच साक्ष देणाऱया खेळाडूंची सुरक्षा व्यवस्था कमी केल्याचे वृत्त आले. त्यामुळे विनेशने दिल्ली पोलीस, दिल्ली महिला आयोग, राष्ट्रीय महिला आयोगला टॅग करत सुरक्षा व्यवस्था हटवल्याची पोस्ट केली.
त्यामुळे खडबडून जागे झालेल्या दिल्ली पोलिसांनी सुरक्षेत कोणतीही चूक झाली नाही. सुरक्षा व्यवस्था कायम आहे. जर सुरक्षा जवानांना डय़ुटीवर यायला उशीर झाला असेल तर त्यांची चौकशी केली जाईल, अशी माहिती देत विनेशचे आरोप फेटाळले.